जीभ घसरली – अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेश सचिव सुरेश पाटील यांचे निंदाजनक कृत्य – छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख
यापूर्वीदेखील पाटील यांनी केली होती ही वादग्रस्त वक्तव्य
धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश सचिव सुरेश पाटील यांनी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने संताप व्यक्त होत आहे. शरद पवार गटावर टीका करताना पाटील यांनी अरे काय करणार ‘छत्रपती’ त्याची तलवार कधी खाली यायची तो घोड्यावरून केव्हा खाली उतरायचा” अशा भाषेत टीका केली. पाटील यांच्या विरोधात शिवप्रेमीनी संताप व्यक्त केला आहे, या प्रकारावर राष्ट्रवादी काय भुमिका जाहीर करते याकडे लक्ष लागले आहे.
वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असलेल्या सुरेश पाटील यांनी यापूर्वी देखील बेभान होत तोंडसूख घेतले आहे. अजित पवार व्यासपीठावर असताना त्यांनी राष्ट्रवादी संपली असे वक्तव्य केले तर मराठा आरक्षण विषयावर मंत्री तानाजीराव सावंत यांना भर चौकात उभे करुन मारू असे वक्तव्य केले होते. पाटील हे वाचाळवीर नेते म्हणून देखील जिल्ह्यात ओळखले जातात. राष्ट्रवादी शिवसेना नंतर भाजप व पुन्हा घरवापसी करीत राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
शरद पवार गटाचे नेते संजय दुधगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना २ दिवसांपूर्वी साकडे घालत आंदोलन केले होते. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांसह सर्वसामान्य नागरिकांची भाजप सरकारकडून मोठी पिळवणूक केली जात असून, जिल्ह्यावर सातत्याने संकटे चालू आहेत, मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच मंत्रिमंडळ बेफिकीर वागत आहेत. महाराज आपण प्रजेच्या हितासाठी शेतकरी, शेतमजूर यांना संकटात मदत केली. त्यांना संरक्षण दिले, मात्र आज तुमच्या धोरणाच्या विरोधात तुमच्या नावाने या सरकारकडून मताचा जोगवा मागितला जात आहे. त्यासाठी महाराज या सरकारला सद्बुध्दी द्यावी, या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आनोखे आंदोलन केले होते.
मात्र, दुधगावकर यांनी केलेल्या आरोपांवर टीका करताना अजित पवार गटाचे नेते सुरेश पाटील यांची जीभ घसरली आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला उत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुरेश पाटील यांनी एकेरी उल्लेख केला आहे. १४ जुलै रोजी अजित पवार गटाच्या वतीने कार्यकर्त्याची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अजित पवारांचे विश्वासू मानले जाणारे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली होती.
आमदार सतीश चव्हाण यांना काम असल्याने ते लवकर भाषण उरकून निघून गेले. सतीश चव्हाण निघून गेल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर जोरदार टीका केली.
यावेळी बोलाताना सुरेश पाटील म्हणाले की, अरे काय मुजरा करता, “अरे काय करणार ‘छत्रपती’ त्याची तलवार कधी खाली यायची तो घोड्यावरून केव्हा खाली उतरायचा” अशा भाषेत सुरेश पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.