जामीन मंजुर – तथाकथीत राष्ट्रसंत लोमटे महाराज यांना बलात्कार प्रकरणात दिलासा मात्र जेलमध्येच राहणार मुक्काम
धाराशिव – समय सारथी
कळंब तालुक्यातील श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र मलकापूरचे तथाकथीत राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला असुन कोर्टाने त्यांचा नियमित जामीन मंजुर केला आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यात त्यांचा जामीन नाकारण्यात आल्याने त्यांचा मुक्काम तूर्तास तरी धाराशिव येथील जेलमध्ये असणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाची बनावट कागदपत्रे व बनावट शिक्के वापरून विकास कामाचा प्रस्ताव करुन शासनाला एक कोटी दहा लाख निधीचा गंडा घातल्याच्या प्रकरणात पोलिसांनी लोमटे महाराज यांना अटक केली होती तसेच एका भाविक महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने अटक केली होती त्यात त्यांना जामीन मंजुर झाला आहे.
मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांनी जुन्याच झालेल्या कामावर नव्याने एक कोटी निधी आणल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतने हा निधी रद्द करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला होता. सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून गावातील सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलिसात तक्रार केली होती.चौकशीत पोलिसांनी तपास करुन अहवाल पंचायत समितीला सादर केला होता. सदर अहवालात ठरावातील सूचक,अनुमोदक,ग्राम सेवक,सरपंच यांच्या केलेल्या चौकशीत लोमटे महाराजांनी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सांगूनही पंचायत समितीचे चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी टी जे जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच,रुक्मिणी आगतराव घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर बनावट कागदपत्र,सही,शिक्के,बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कळंब येथील सत्र न्यायाधीश कळंब यांनी येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये भादवी कलम 376, 354, 354 अ, 354 सी, 341, 323, 504, 506, 509, आयटी कायदा कलम 66 ई, 67, 67 अ तसेच जादूटोणा कायदा कलम 2(1) प्रमाणे दाखल असलेल्या विनयभंग व बलात्कार प्रकरणात ॲड रवींद्र मैंदाड यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन जामीन मंजूर केली. सदर प्रकरणात युक्तिवाद कामी ॲड श्रीकांत माळी, ॲड आकांक्षा माने, ॲड राम राऊत यांनी सहकार्य केले.