चिंताजनक – कोरोना पॉझिटिव्हिटी दर दुप्पट होतोय
ओमीक्रॉनचे 5 रुग्ण तर नवीन 23 रुग्ण सापडले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात चिंताजनक स्तिथी निर्माण झाली असून कोरोना रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी दर दररोज दुप्पट होतोय.ओमीक्रॉनचे 5 रुग्ण तर नवीन 23 रुग्ण सापडले असल्याने स्तिथी नियंत्रणात असली तरी दिवसेंदिवस गांभीर बनत चालली आहे. रविवारी कोरोनाचे 270 नमुने तपासण्यात आले त्यापैकी 23 म्हणजे 8.51 टक्के नमुने पॉझिटिव्ह सापडले. ओमीक्रॉनचे 5 रुग्ण सापडले असून त्यात कळंब 3,उमरगा व उस्मानाबाद येथील 1 रुग्णाचा समावेश आहे या सर्वांचा 10 दिवसांचा विलगीकरण कालावधी संपला आहे.
नमुने तपासणीत रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण शुक्रवारी 2.90 टक्के होते मात्र हे प्रमाण शनिवारी 4.24 टक्के जवळपास दुप्पट होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक 10 रुग्न सापडले आहेत तर परांडा, भूम व लोहारा तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही. रविवारी 23 रुग्ण सापडले असून 9 जण उपचार नंतर बरे झाले आहेत तर जिल्ह्यात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 306 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 23 रुग्ण सापडले त्यात तुळजापूर 10, उमरगा 1, कळंब 1, वाशी 4 रुग्ण सापडले. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर कोरोनाचे 68 हजार 98 रुग्ण सापडले त्यापैकी 65 हजार 711 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 96.51 टक्के आहे. जिल्ह्यात आजवर 1 हजार 509 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.22 टक्के आहे.
रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढत असून गेल्या 4 दिवसात हे प्रमाण चार पटीने वाढले आहे. 31 डिसेंबर रोजी 9, नवीन वर्षी 1 जानेवारील 21, 2 जानेवारी 2, 3 जानेवारी 18, 4 जानेवारी 35, 5 जानेवारी 40, 6 जानेवारी 23, 7 जानेवारीला 80 रुग्ण सापडले तर शनिवारी 66 रुग्ण सापडले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना करण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन दक्ष व सज्ज झाले आहे. महसूल व पोलीस यंत्रणाही कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काळजी व प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयात 5 हजार 445 बेडस तयार करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 1 हजार 65 बेड उपलब्ध आहेत. 1 हजार 400 ऑक्सिजन बेड, 183 व्हेंटिलेटर, 199 आयसीयू बेडची गरजेनुसार उपलब्धता करण्यात येणार आहे तर खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यात 52.44 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन उपलब्ध होणार असून 12.14 मेट्रिक टन ऑक्सिजन हा हवेतून जमा करून सिलेंडरमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.