धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरार आरोपी विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांचे एक एक कारनामे समोर येत आहेत. आत्मसमर्पनाची नाट्यमय घडामोडी त्यानंतर ड्रग्ज तस्करीत फरार असताना देखील मटका बुकीचा व्यवसाय तेजीत सुरु होता. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकत मटका माफियाचा पर्दाफाश केला, या बुकीचा मालक विनोद गंगणे असल्याचे समोर आले आहे. गंगणे हे गेली एक दशकापेक्षा अधिक काळापासून मटकाबुकी असुन त्यांच्यावर मटक्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत. ड्रग्ज, मटका यासह अन्य अवैध धंद्यात ते ‘भागीदार’ असुन त्यांच्या सन्मानासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील आता कोणती ‘योजना’ आणणार याकडे लक्ष लागले आहे. मटका बुकीचा भांडाफोड सुद्धा यांनीच केला, ही देण व ‘त्याग’ पण त्यांचाच,असा दावा केल्यास आश्चर्य वाटायला नको.
आमदार पाटील हे नवनव्या संकल्पनांचे चालते बोलते ‘विद्यापीठ’ म्हणुन राज्यभर ओळखले जातात. गंगणेच्या नागरी ‘सन्मानासाठी’ व ‘प्रतिमा’ शुद्धीकरणासाठी आमदार काहीतरी ‘भावनिक’ तर्कशुद्ध पर्याय काढतील. यांच्या अवैध धंद्याचे आर्थिक ‘लाभार्थी’ कोण असाही प्रश्न चर्चीला जात असुन ते समोर येणे गरजेचे आहे. ‘लाडोबा’ बनत पाठबळ दिल्याने आमदार सध्या चर्चेच्या शिखरावर असुन अश्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. गृहमंत्री राहिलेल्या डॉ पद्मसिंह पाटील यांनी कधीही राजकारणासाठी अवैध धंदे व तश्या कार्यकर्ते यांना थारा,तडजोड केली नाही असे त्यांचे सहकारी सांगतात मात्र आता सत्तेच्या छत्रछायेखाली नवीन संस्कृती वाढत आहे अशी टीका होतेय.
सामान्यत पोलिसांना सगळे माहिती असते मात्र तुळजापुर ड्रग्ज तस्करीत पोलिसांकडे काहीही ठोस माहिती नव्हती. ड्रग्ज तस्करीत गंगणे हा पोलिसांचा ‘खबऱ्या’ असुन त्याने ‘टीप’ दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचा दावा तुळजापुरचे ‘ड्रग्ज स्पेशालिस्ट’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे. त्यांनी माहिती दिली, आरोपीना पकडून दिले हे काही कमी नाही त्यामुळे त्यांचा आदर सन्मान करा, त्यांच्या विषयी उपकृत (उपकाराची) भावना ठेवा असे आवाहन पाटील यांनी केले होते, त्यानंतर पोलिसांच्या छाप्यात गंगणे हा मटकाबुकीचा ‘किंग’ असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे यातूनही आमदार ‘कल्पक’ मार्ग काढतील असा काहींना विश्वास आहे.
एकीकडे आमदार म्हणतात त्यांचा आदर करा, उपकार माना तर दुसरीकडे गंगणे म्हणतात की, राणा दादाच्या माध्यमातुन सुजलाम सुफलाम करू. त्याना बदनाम करू नका. अब्जो करोडपती माणुस आहे,हात जोडून विनंती आहे दादाना बदनामी करू नका. गोलमाल काय, त्यामुळे जनता संभ्रमात आहे.
तुळजापुरचे राजकारण वेगळे असल्याचे काही घटनावरून दिसते, काही अवैध धंदे करणारे सर्वपक्षीय नेते यांच्या हातात सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. अवैध धंद्यातुन पैसा, पैसातुन राजकारण, समाजकार्याचा बुरखा पांघरून ‘तारणहार’ बनून राजकारणातुन सत्ता असे इथले गणित आहे. अवैध धंद्याना पाठबळ म्हणुन सत्तेसोबत राहण्याचा इथला राजकीय धर्म, मग पक्ष सरकार कोणतेही असो.. घरकुल, यात्रा अनुदान, ड्रग्ज, मटका अशी मोठी जंत्री असुन बाजार समिती, नगर परिषद, पंचायत समिती यांच्यासाठी भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. आगामी काळात येणाऱ्या हजारो कोटींच्या निधीवर आता या टोळीचा डोळा आहे.