खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले – भरधाव टिप्पर अंगावर येताच उडी मारली, आरोपीस अटक
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना थोडक्यात बचावले. एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवीत ते खासदार ओमराजे यांच्या अंगावर घातले मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यानंतर त्या टिप्परचा पाठलाग करीत एकास पकडले असुन पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हा प्रकार मोटार सायकल ओव्हरटेक करताना चुकीने घडला असल्याचे चालकाने सांगितले असुन हा घातपाताचा प्रकार की दुसरे काही याचा पोलीस तपास करीत आहेत. मी सुखरूप असुन सुदैवाने वाचलो अशी प्रतिक्रिया ओमराजे यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी गोवर्धनवाडी ते तेर या रोडवर व्यायामासाठी जात असताना सीड फार्मजवळ पाठीमागून जोरदार वाहनाचा आवाज आला त्यावेळी एक भरधाव टिप्पर एमएच 44 के 8844 आले तो अंगावर येत असल्याचे पाहताच त्यांनी उडी मारली त्यानंतर पाठीमागून येत असलेल्या उमेश थोडसरे यांच्यात मोटर सायकलवर पाठलाग केला, त्यावेळी टिप्पर रेल्वे फाटकवर पडलेने थांबले. ड्राइव्हरने त्याचे नाव रामेश्वर कांबळे सांगितले. तो बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील असुन हा प्रकार ओव्हरटेक करताना चुकीने घडल्याचे सांगितले.
कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास राजाभाऊ सातपुते हे करीत आहेत.