खळबळजनक – कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्टर पॉझिटिव्ह
उस्मानाबाद – समय सारथी
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची बाब चिंताजनक असताना त्यात आणखी एक भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका डॉक्टरने कोरोना लसीकरणाचे 2 डोस घेऊनही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे.कोरोनाचे 2 डोस घेतल्यानंतर ही महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.विशेष म्हणजे त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देऊन एक आठवडा झाला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या डॉक्टर बालरोगतज्ञ म्हणून काम करीत असुन त्यांना तापीची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती त्यात त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे अशी माहिती तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ चंचला बोडके यांनी दिली , कोरोना झालेल्या महिला डॉक्टर यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन डॉ बोडके यांनी केले आहे.
गेल्या 15 दिवसापासून तुळजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता डॉक्टर ही पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोनाची वाढती संख्या पाहता तुळजाभवानी मंदिरासह जिल्ह्यातील सर्व धार्मिक , प्रार्थना स्थळे दर रविवारी जनता कर्फ्यु दिवशी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.तुळजापूरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. तुळजापूर येथील अनेक व्यापारी, भाविक पुजारी सर्रास विनामस्क असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुले विनामस्क वावरत आहेत त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
लसीकरण व त्याचा प्रभाव आणि प्रश्नचिन्ह ?
भारतात सध्या सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड व भारत बायोटेकची कोविवॅक्स या दोन लसीचे लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा बुस्टर डोस देण्यात येतो व त्यांनतर काही दिवसांनी कोरोना आजाराशी लढण्याची प्रतिकारक्षमता ( इमुनिटी ) तयार होते असे डॉक्टर सांगत आहेत. अनेक जणांना लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला तरी कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत त्यामुळे लसीकरण व त्याच्या प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह व संभ्रम निर्माण झाला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेतली आहेत तर वैद्यकीय क्षेत्र , महसूल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण केले आहे.मास्क व सॅनिटायझर वापर व सुरक्षित अंतर हेच सध्या तरी प्रभावी साधन ठरत आहे त्यामुळे याचा वापर करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आलेख
उस्मानाबाद जिल्ह्यात काल कोरोनाचे सर्वाधिक 58 रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद तालुक्यात 11,तुळजापूर 8, उमरगा 9, लोहारा 6,कळंब 10 ,वाशी 4, भूम 2 व परंडा तालुक्यात 8 रुग्ण सापडले आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 296 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दिवसेंदिवस उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढत असुन अनेक लोक बेफिकीरपणे खुलेआम फिरत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी 10 डेडिकेटेड कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असुन 1400 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात 1200 ऑक्सिजन बेड तर 200 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे.
कोरोना बाधीत रुग्ण वाढण्याचा आलेख हा वाढत असताना प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. 2 मार्चला 40 रुग्ण,3 मार्च 16,4 मार्च 45,5 मार्चला 26, 6 मार्चला 30, 7 मार्च 49, 8 मार्च 16,9 मार्च 38, 10 मार्च 24 तर 11 मार्चला सर्वाधिक 58 रुग्ण सापडले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लाख 33 हजार 865 नमुने तपासले त्यापैकी 17 हजार 680 रुग्ण सापडले म्हणजेच रुग्ण सापडण्याच दर 13.67 टक्के आहे. जिल्ह्यात 16 हजार 758 रुग्ण बरे झाले असून 95 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे.कोरोना संकटात आजवर 586 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3.32 टक्के मृत्यू दर आहे.
तर तुळजाभवानी मंदिर बंदबाबत कटू निर्णय घेणार – जिल्हाधिकारी
उस्मानाबाद जिल्हा हा पर्यटन पूरक जिल्हा असून तुळजाभवानी मंदिर सध्या तरी पूर्णतः बंद करण्यात येणार नाही मात्र भाविक , पुजारी व व्यापारी यांनी मास्कचा व नियमावलीची अंमलबजावणी न केल्यास कोरोना रुग्णाची संख्या वाढून स्थिती हाताबाहेर जाऊ शकते त्यामुळे तत्कालीन स्थिती पाहून कटू निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते असा सूचक इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. लॉकडाऊनचे चक्र हे न परवडणारे असून सर्वानी गांभीर्य ओळखून वागले तर कोरोना नियंत्रण शक्य आहे. तुळजापूरसह इतर धार्मिक क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी पुजारी व भाविक यांच्या कोरोना तपासणी करण्यात येणार असून धार्मिक व पर्यटन क्षेत्रात नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क व सज्ज
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. आगामी ३ महिने पुरेल इतका औषध साठा , ऑक्सिजन पुरवठा, तपासणी व उपचारासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर चाचणीची संख्या वाढविणे तसेच लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार पद्धतीवर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण लॉकडाऊन लागू नये ही प्रशासनाची इच्छा असल्याची भूमिका जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या १५ दिवसात रुग्णाची संख्या तिपटीने वाढत आहे त्यामुळे १८ पोलीस स्थानकाच्या हद्दीत महसूल पोलीस विभागाची संयुक्त पथके प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्यास कारवाईसाठी नेमण्यात आली आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंतच्या नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तपासणी संख्या वाढावी यासाठी कोरोना टेस्टिंग लॅब नव्याने जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.