कोरोनाचा त्सुनामी – एप्रिल महिन्यात कहर व मृत्यूच तांडव
तुलनात्मक विश्लेषण – एप्रिल का ठरला सर्वाधिक घातकी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कोरोनाची दुसरी लाट ही सर्वात घातकी ठरत असुन पहिल्या लाटेच्या तुलनेत याला कोरोनाचा त्सुनामी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मार्च महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या लाटेची चाहूल रुग्ण संख्या वाढत चालल्याने लागली होती मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाने कहर करीत अनेकांना बाधीत केले तर 274 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी घेत अक्षरशः मृत्यूच तांडव घातले, नातेवाईकांच्या आक्रोशाने स्मशानभूमीही काही काळ गहिवरली. एकाच वेळी 20 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची तर अंत्यसंस्कारसाठी जागा नसल्याने वाट पाहायची दुर्दैवी वेळ आली. कोरोनाचे मागील संपूर्ण वर्षाचा आकडा एकीकडे तर दुसरीकडे एकटा एप्रिल महिनाचे आजवरचे 26 दिवस सर्वांसाठी घातकी ठरले आहेत. एप्रिल 2021 च्या 26 तारखेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 14 हजार 530 रुग्ण सापडले तर 274 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( यात सारीने मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश नाही ) उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 26 दिवसात सरासरी दररोज 558 रुग्ण सापडले तर दररोज सरासरी 10 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची मागील 13 महिन्याची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर एप्रिल महिना प्रशासन व आरोग्य यंत्रणेसाठी परीक्षेचा व संयमाचा काळ ठरला.
उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल 2020 महिन्यात कोरोनाचे 3 रुग्ण सापडले त्यानंतर मार्च 2021 या एक वर्षाच्या काळात 20 हजार 535 रुग्ण सापडले तर 596 जणांचा कोरोनाने बळी घेतला मात्र एप्रिल 21 या महिन्याच्या 26 दिवसात तब्बल 14 हजार 530 रुग्ण सापडले तर 274 जणांचा कोरोनाने बळी घेतला त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक घातक ठरली आहे. जिल्हयात कोरोनाचे आजवर 35 हजार 65 रुग्ण सापडले असून त्यापैकी एकट्या एप्रिल महिन्यात 14 हजार 530 म्हणजे आजवरच्या एकूण रुग्णाच्या 41.30 टक्के रुग्ण हे या 26 दिवसात सापडले असून अजून एप्रिल महिना संपायला 4 दिवस बाकी आहेत. एकाच महिन्यात इतके रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर व प्रशासनावर ताण आला मात्र त्यांनी उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळावर उपचार केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 869 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. मे 2020 या महिन्यात कोरोनाने 2 रुग्णांचा बळी घेतला त्यानंतर 1 वर्षात मार्च 2021 अखेर 596 जण मयत झाले मात्र एप्रिल 2021 मध्ये आजवर 26 दिवसात 274 जणांचा मृत्यू झाला म्हणजे आजवरच्या एकूण मृत्यूच्या तुलनेत 31.53 टक्के मृत्यू हे एप्रिलमध्ये झाले , याच एप्रिल महिन्यात जवळपास 15 ते 20 मृत्यू हे सारीने झाले ते मृत्यू कोरोनाच्या मृत आकडेवारीत समाविष्ट केलेले नाहीत. एक वेळ अशी होती की जानेवारी महिन्यात एकही मृत्यू नव्हता तर डिसेंबर 20 ते मार्च 21 या 4 महिन्यात एकूण 25 मृत्यू होते तर दुसरीकडे 16 व 21 एप्रिलला एकाच दिवशी प्रत्येकी 23 जणांचा बळी गेला. सारी व कोरोनाने झालेल्या मृत्यूने हाहाकार उडाला तर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी जागा कमी पडली, आपल्या कुटुंबातील मयत सदस्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईकांनी मिळेल तिथे जागा शोधली हा क्षण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.
उस्मानाबाद जिल्ह्यात एप्रिल 2021 च्या 26 तारखेपर्यंत 14 हजार 530 रुग्ण सापडले त्यातील सर्वाधिक 51.07 टक्के म्हणजे 7 हजार 421 रुग्ण हे उस्मानाबाद शहर व तालुक्यातील होते त्यामुळे दुसऱ्या लाटेत उस्मानाबाद तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला. शहरात रुग्ण सापडल्याने कोरोनाचा अचानक विस्फोट झाला आणि आरोग्य यंत्रणा आजही कोलमडली आहे. रुग्ण वाढीची अनेक कारणे आहेत, सुपर स्प्रेडर ठरणारे नागरिकांवर वेळीच नियंत्रण आणता आले असते मात्र काही जणांनी त्याला गंभीरपणे न घेतल्याने अनेक परिणामांना सामोरे जावे लागत आहे मात्र सुदैवाने उस्मानाबाद तालुक्याची आकडेवारी मागील 8 दिवसांपासून 275 ते 325 च्या मध्ये आहे. त्यातच दुसरी दिलासादायक बाब म्हणजे एप्रिल महिन्यात 14 हजार 530 रुग्ण सापडले असले तरी त्यापैकी व पूर्वीचे मार्चचे काही असे 10 हजार 298 रुग्ण म्हणजे 70.87 टक्के कोरोना उपचारनंतर बरे होऊन घरी गेले आहेत ही एक मोठी जमेची बाजू व आरोग्य यंत्रणेचे मोठे यश आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 7 हजार 903 नागरिकांच्या तपासणी गेल्या 13 महिन्यात करण्यात आल्या त्यापैकी 51 हजार 947 म्हणजे 24.98 टक्के तपासणी ही केवळ एकट्या एप्रिल महिन्यात करण्यात आली. यात 43 हजार 312 रॅपिड अँटीजन व 8 हजार 635 आरटीपीसीआर तपासणीचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने या तपासण्या करण्यासाठी मोठे प्रयत्न व नियोजन केले.51 हजार 947 टेस्ट पैकी 14 हजार 530 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले हे प्रमाण 27.97 टक्के आहे. नागरिकांना लक्षणे दिसल्यावर तात्काळ तपासणी करता यावी यासाठी अनेक ठिकाणी तपासणी केंद्र स्थापन करून कोरोना चाचणी करण्यात आली.
*पहिल्या लाटेशी एप्रिल महिन्याची तुलनात्मक आकडेवारी*
गेल्या वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्याच्या काळात पहिली लाट आली त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 4 हजार 524, सप्टेंबर 6 हजार 488 व ऑक्टोबर 2 हजार 554 असे 3 महिन्यात 13 हजार 566 कोरोना रुग्ण सापडले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात 3 हजार 246 रुग्ण व एप्रिलच्या 26 दिवसात 14 हजार 530 असे विक्रमी रुग्ण सापडले. म्हणजे एकट्या एप्रिल महिन्यात 107 पटीने अधिक रुग्ण सापडले. ही आकडेवारी जरी रुग्णांची असली तरी रुग्ण वाढ झाल्याने सहाजिकच सर्व सुविधांवर ताण पडला.रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवडासह अन्य औषधें व मनुष्यबळ अपुरे पडले.दुसऱ्या लाटेची शक्यता व तयारी याबाबत सूचना होत्या मात्र उस्मानाबादच्या बाबतीत सर्व अंदाज फोल ठरले.
कोरोनाचा पहिल्या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णां पैकी 40 टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागत होता मात्र दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या तर वाढलीच शिवाय जवळपास 70 टक्के पेक्षा अधिक रुग्णांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात ऑक्सिजन लागला त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला व प्रशासनाला तो उपलब्ध करताना रात्रीचा दिवस करावा लागला व अनेक कसरती कराव्या लागल्या.अखेर उस्मानाबाद येथील लिक्विड ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळला.
*कोरोनाचा धोका अजुन टळलेला नाही , काळजी घ्या*
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी बनून कहर करीत आहे त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील 173 गावात कडक निर्बंध घातले आहेत तर 68 गावांच्या सीमा बंद केल्या आहेत.कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसल्यास ती अंगावर न काढता चाचणी करून योग्य वेळी उपचार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी , माझे गाव कोरोना मुक्त गाव या मोहीम राबविणे सुरू असून यात आवश्यक ती माहिती व नियमांचे पालन केले पाहिजे. मास्क , सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स , परिसर स्वच्छ ठेवणे व सकस आहार , योग प्राणायाम यावर भर देणे गरजेचे आहे. कोरोनाची ही दुसरी लाट कमी व्हायला आणखी 20 ते 30 दिवस लागतील असा अंदाज आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविणे व त्यात नागरिकांनी सहभाग घेणे गरजेचे आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्या लाटेइतकेच रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यात सापडल्याने आरोग्य यंत्रणेवर , पोलीस प्रशासनावर भार पडला, यात अनेक डॉक्टर ,पोलीस, महसूल,जिल्हा परिषद, नगर परिषद सफाई कर्मचारी कर्तव्य बजावताना शहीद झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवातीपासूनच वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असताना प्रयत्न सुरू आहेत. कोरोना झाल्यानंतरही पालकमंत्री शंकरराव गडाख,खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आमदार कैलास पाटील, ज्ञानराज चौगुले,डॉ तानाजीराव सावंत, राणाजगजितसिंह पाटील , नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन,अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, शिरीष यादव, महेंद्रकुमार कांबळे, राजकुमार माने,चारुशीला देशमुख, प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील, डॉ इस्माईल मुल्ला, आयएमए अध्यक्ष डॉ सचिन देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे,डीवायएसपी मोतीचंद राठोड,तहसीलदार गणेश माळी, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी,तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सरपंच, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी,आरोग्य सेविका, शिक्षक, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, विविध सामाजिक संस्थांचे व राजकीय पक्षाचे नेते, प्रतिनिधी हे खिंड लढवीत आहेत.या कोरोनाच्या लढाईत प्रत्येकाने नियमांचे पालन करून आपले योगदान दिले पाहिजे.
*कोरोना आकडेवारी तक्ता*
महिना कोरोना रुग्ण मृत्यू
एप्रिल 20 3 0
मे 20 68 2
जुन 20 149 9
जुलै 20 940 43
ऑगस्ट 20 4524 94
सप्टेंबर 20 6488 227
ऑक्टोबर 20 2554 152
नोव्हेंबर 20 1023 44
डिसेंबर 20 585 3
जानेवारी 21 576 0
फेब्रुवारी 21 379 7
मार्च 21 3246 15
एप्रिल 21 14530 274
( एप्रिल 2021आकडेवारी ही 26 एप्रिल पर्यंतची आहे )