कोणाच्या खांद्यावर कोणाचे राजकारण – मंत्री सावंत, ओमराजे व दोन्ही पाटलांची सर्वत्र चर्चा
राजकीय वैर नसते, वेगळा अर्थ काढू नका – डॉ सावंत
भाजप आमदाराचे गुण लक्षात आल्याने संदेश दिला असेल – खासदार ओमराजे
प्रलोभन व दहशतीला भीक न घालता पडत्या पावसात अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडायला – आमदार पाटील
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मुख्य कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना जवळ केले, त्यां दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर मंत्री सावंत व खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा व अबोला होता तो या कार्यक्रम निमित्ताने काही अंशी दूर झाला.
मंत्री सावंत व ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यात सुरुवातीला मधुर राजकीय संबंध होते मात्र शिवसेना फुटल्यानंतर अबोला होता. सावंत यांनी हात टाकल्यावर त्याची राजकीय चर्चा राज्यभर रंगली व अनेक तर्कवितर्क काढले जाऊ लागले मात्र तिघांनी याबाबत स्पष्टीकरण दिले व तसे राजकीय काही नाही असे सांगितले असले तरी कोणाच्या खांद्यावर कोणाचे राजकारण अशीच चर्चा दिवसभर रंगली.
या सर्व घडामोडी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील डोळ्याने टीपत होते त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काहींनी याची राजकीय धास्ती घेतली तर काहींची धाकधुक वाढली. या घटनेने सत्ताधारी गटात धाकधूक तर विरोधी गटाला गुदगुल्या झाल्या.
गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधीच्या असमतोलतेबाबत लेखी तक्रार केल्यानंतर दोघात दरी पडली होती. त्यातच आमदार राणा यांचे परंपरागत राजकीय विरोधक खासदार ओमराजे व पाटील यांच्यासोबत सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळीक वाढवली. सावंत यांनी समय सूचकता दाखवीत सूचक संदेश दिला.
राजकीय वैर नसते, वेगळा अर्थ काढू नका – डॉ तानाजीराव सावंत
राजकीय वैर वगैरे काही नसते ही संकल्पना तुम्ही काढून टाका,वेगळा अर्थ काढू नका. ओमराजे हे भारतातल्या मोठ्या सभागृहाचा लोकसभेचे लोकप्रतिनिधी आहेत तर आमदार कैलास पाटील हे राज्यातील लोकप्रतिनिधी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने इथे धर्म, जात, पक्ष, मतभेद विरहित असते. जयंती साजरी करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय एकत्र आलो, ती महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची परंपरा जपली असे स्पष्टीकरण मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दिली.
भाजप आमदाराचे गुण लक्षात आल्याने संदेश दिला असेल – खासदार ओमराजे निंबाळकर
उस्मानाबाद जिल्ह्यात सत्ताधारी शिंदे गट व भाजपात वाद सुरु आहे. भाजप आमदाराचे गुण लक्षात आल्याने व त्यांना संदेश द्यायचा असल्याने डॉ सावंत यांनी आमच्या खांद्यावर हात टाकला असावा असे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची तक्रार भाजप आमदार राणा पाटील यांनी केल्याने त्याचा संदर्भ आजच्या घटनेत असू शकतो. धनुष्यबाण ज्याला पेलवत असतो त्याच्याच हातात शोभतो याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत, भाजपला परिणाम भोगावे लागतील.आम्ही काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत.
प्रलोभन व दहशतीला भीक न घालता पडत्या पावसात अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडायला – आमदार पाटील
शिवजयंती ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांची नव्हती, सर्वपक्षीय कार्यक्रम होता. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अर्जुनाप्रमाणे आम्हाला फक्त माशाचा डोळा हेच लक्ष दिसते, जर कोणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत आले तर त्यांच्या नेतृत्वात काम करू असे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. कोणत्याही प्रलोभनाला किंवा दहशतीला भिक न घातला पडत्या पावसात, अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडण्यासाठी ? असा प्रतिप्रश्न केला. मंत्री सावंतानी खांद्यावर हात का ठेवला ? त्याच्या मागचा हेतू काय? ते त्यांनाच माहित पण तेवढ्या काळापुरता खांद्यावर हात टाकला म्हणुन वेगळ्या चर्चा घडत असतील तर ठाकरे परिवाराने मला आजची ओळख दिलेली आहे. योगायोगाने झालेली काही क्षणांची भेट आमच राजकीय भविष्य बदलू शकत नाही. आमचं राजकीय जीवन ठाकरे कुटुंबासाठी समर्पित असून अशा संभ्रमाच्या राजकारणाला मी महत्व देत नाही. आमचा विरोधक हा राजकीय आहे त्यांना उत्तरही आम्ही राजकीय कार्यक्रमात देऊ, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती जपली.