कानाडोळा – कुणकुण लागताच जानराव यांनी मार्च महिन्यात घोटाळ्याबाबत दिला होता लेखी अहवाल
उस्मानाबाद – समय सारथी
शोषखड्डे अपहार प्रकरणात आता एक पत्र सध्या चर्चेत आले असून घोटाळा होत असल्याचे पुराव्यासह लेखी कळवूनही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे यावरून दिसते. उस्मानाबाद जिल्ह्यातील खेड, मेडसिंगा, ढोकी, बेंबळी व उपळा या गावात शोषखड्डे योजनेत घोटाळा होत असल्याची कुणकुण लागताच पंचायत समितीचे रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी नितेश जानराव यांनी मार्च 2022 महिन्यात गटविकास अधिकारी यांना लेखी कळविले होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वेळीच यावर कारवाई झाली असती त्याची व्याप्ती वाढली नसती मात्र घोटाळ्याचा कट शिजला असल्याने हे पत्र दडविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी 11 मार्च 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर सहायक कार्यक्रम अधिकारी जानराव यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत तसेच ऑनलाईन खाते व्यवहार तपासून एक लेखी अहवाल 24 मार्च 2022 रोजी गटविकास अधिकारी यांना दिला होता त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यांचा अहवाल असलेले पत्र या घोटाळ्यात एक महत्वाचा प्राथमिक पुरावा आहे.
खेड, मेडसिंगा, बेंबळी, उपळा व ढोकी या गावात शोषखड्डे काम पाहण्यासाठी गेल्यावर तिथे कामे केली नसल्याचे दिसले तर रोहयो संकेतस्थळाची पाहणी केली असता त्या कामावर खर्च झाल्याचे दाखविले आहे. त्यात उपळा येथे 15 लाख 82 हजार, खेड येथे 10 लाख 25 हजार, ढोकी येथे 18 लाख 17 हजार, बेंबळी येथे 16 लाख 5 हजार व मेडसिंगा येथे 8 लाख असे 68 लाख 45 हजार खर्च झालेला दिसून आला.
मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या वित्तीय अनियमिततेबाबत जानराव यांनी त्यावेळी लेखी कळविले होते तसेच तांत्रिक सहायक, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्याकडून याबाबत सखोल विचारणा करुन एकतर कामे पुर्ण करुन घ्यावीत अन्यथा संबंधिताकडून वसुली करुन घ्यावी असे नमूद केले.
हजेरीपत्रक पासिंग करतेवेळी काम जागेवर झाल्याचे पाहून खात्री करुन देयक द्यावे मात्र असे निदर्शनास आले आहे की हा सर्व प्रकार संगनमताने तांत्रिक सहायक, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ठराविक ग्रामपंचायतीचे प्रस्ताव हे अतितात्काळ मंजुर करुन घेऊन कामे सुरु करण्याची कारवाई केल्याचे जानराव यांच्या लेखी पत्रात म्हंटले आहे. या घोटाळ्यात कोण कोण अडकले आहे याची निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर त्र्यस्त यंत्रणामार्फत चौकशी झाली पाहिजे.