व्हीआयपी दर्शन पास घोटाळा, ड्रग्ज प्रकरणात जवळचा ‘व्यसनी’ तर विरोधक ‘पेडलर’ – 22 फरार आरोपीना अभय
हक्कभंगचा इशारा, अधिकाऱ्यांचे कान टोचले – कोणाचे किती ऐकायचे ते ठरवा – आमदार कैलास पाटील आक्रमक
धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी यांची तुळजापूर विकास आराखडा व इतर अनुषंगाने बैठक घेतली, या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचत, उघडणी केली. राणाजगजीतसिंह पाटील हे कळीचे नारद असुन त्यांचे अख्खे आयुष्य काड्या लावण्यात गेले आहे, ते कधी सुधारणार नाहीत. जनता दरबार, खासदार कार्यालय, डीपीडीसी निधी वाटप स्थगिती आणणे हे त्याची उदाहरणे आहेत. डबक्यात राहणाऱ्या छोट्या लोकांची ही विचार सरणी आहे. काहींना पैसा व सत्तेचा इतका माज आला की त्याचे मापन राहिले नाही अशी टीका केली. नियमानुसार खासदार कार्यालय तरतूद आहे, जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊनही अंमलबजावणी होऊ दिली जात नाही असा आरोप ओमराजे यांनी केला.
अधिकारी म्हणुन नियमानुसार काम करा, अधिकारी यांनी कोणाचे किती ऐकायचे हे ठरवा. यापुढे प्रत्येक गोष्ट नियमानुसार करायची असा सुचक इशारा दिला. पोलिस अधीक्षक बैठकीला आले नाहीत, त्यांना हक्कभंगाची नोटीस देणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. जिल्हाधिकारी 10 मिनिट बैठकीला उशीरा आले त्यांनाही नोटीस देऊ शकतो. मी त्या समितीवर काम केले आहे, कोणाचे तरी ऐकून असे करू नका, तुम्हाला कोण सांगते हे मला माहिती आहे असे ओमराजे म्हणाले.
तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा केला आहे त्यात अनेक त्रुटी आहेत. लोकांची उपजीविका अवलंभून आहे. स्थानिक नागरिक, भाविक, व्यापारी, पुजारी यांची मते विचारात घ्यावीत व निर्णय घ्यावा, दुरुस्ती करावी असे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण करीत माहिती दिली. कुलधर्म, कुलाचार, विधी,परंपरा, उत्सव व इतर बाबी लक्षात घेऊन नागरिकांच्या सुचना व गरजेनुसार बदल करावे असे ते म्हणाले. मंदिराच्या मुळं रचनेत कोणतेही बदल करू नये असे ते म्हणाले.
तुळजाभवानी मंदीर संस्थानमध्ये दर्शन पासच्या नावाखाली मोठा काळाबाजार सुरु असुन मोजक्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना व्हीआयपी दर्शन पासचा कोटा ठरवून देण्यात आला आहे, हा कोटा रद्द करा अन्यथा सगळ्या लोकप्रतिनिधी यांना समान कोटा द्या अशी मागणी केली. जे व्हीआयपी दर्शन पास मोफत दिले जातात त्याची पुन्हा विक्री केली जाते, मंदीर संस्थानने व्हीआयपी कोण याची व्याख्या ठरवावी, भाविकांची लुट थांबवावी. महाराष्ट्राबाहेरील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना येथील भाविकांना पास द्यायचा व आर्थिक लुट सुरु आहे ही थांबवा अन्यथा जनआंदोलनाचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी रुजू झाल्यापासून गेल्या 3 महिन्याचे पासचे रेकॉर्ड तपासा व चौकशी करा अशी मागणी केली.
ट्रस्टी म्हणुन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, पोलिस विभाग,कोर्ट विभाग प्रत्येकी 10 असे 50 व्हीआयपी पास आहेत. स्थानिक आमदार व ट्रस्टी म्हणुन राणाजगजीतसिंह पाटील यांना 50 असे व्हीआयपी पास वाटप असल्याचे प्रशासनाने सांगितले यावर ओमराजे म्हणाले की प्रत्येकाला 10 व आमदारांना 50 असा दुजाभाव का? हे सगळे बंद करा, या पासचा बाजार सुरु असुन भाविकांची लुट सुरु असल्याचा आरोप खासदार ओमराजे यांनी केला, यावेळी तुळजापूर येथील पुजारी, नागरिक यांनी पासचा कसा गैरवापर होतो हे सांगितले.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 22 फरार आरोपीना पोलिस अटक करीत नाहीत, त्याच्यावर राजकीय दबाव आहे हे यातून दिसुन येते.पोलिस अधीक्षक स्वतः काही बोलत नाहीत व त्यांना आरोपी पकडतही नाहीत. ड्रग्ज सारख्या गंभीर विषयात आरोपीना कोणी पाठीशी घालत असेल आणि इथली तरुण पिढी बरबाद करण्यात कोणाचा सहभाग असेल, व त्यांना पाठीशी घालत असेल तर जनतेने त्याला बघून घ्यावे. आई तुळजाभवानी त्याला बघून घेईल, न्याय देईल, असे ओमराजे म्हणाले. पैशातून राजकारण, राजकारणातुन सत्ता, सत्तेतुन पैसा व पैशातुन ड्रग्ज असे घडले आहे.
ड्रग्ज प्रकरणात आरोपींची पेडलर व सेवन करणारे अशी 2 गटात वर्गवारी करणाऱ्या बुद्धीचा तपास करणे गरजेचे आहे. हे का, कशासाठी व कोणत्या आधारे केले. हे त्यांना माहिती, त्यांच्या जवळचा माणुस आहे म्हणुन तो व्यसन करणारा आणि त्यांच्या विरोधातला असेल तर तो मग ड्रग्ज विक्री करणारा पेडलर. ह्यात जे जे सहभागी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अश्या लोकांना समाज जीवनात स्थान नसायला पाहिजे, हे लोक जेलमध्ये असले पाहिजे असे ओमराजे म्हणाले. आतापर्यंत कोण त्यांच्यावर मेहरबानी करतय आणि कोण त्यांना बाहेर सोडले याचा विचार करावा, स्वतःच मुलगा व्यसनी होऊन बरबाद झाला असता तर ते त्यांना चालले असते का असा प्रश्न उपस्थितीत केला.