धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात कला केंद्राचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असुन धाराशिवचा येडशी, आळणी, चोराखळी, वडगाव ज व पिंपळगाव हा भाग कला केंद्राचं ‘माहेरघर’ बनला आहे. लोककलेच्या नावाखाली डीजे व ‘छमछम’ त्याला जोडधंदा म्हणून दारू विक्री, नर्तकीच्या ‘खास बैठका’ यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असल्याने अनेक प्रतिष्ठान जन या व्यवसायात पुर्ण क्षमतेने उतरले आहेत.
तरुण काही नर्तकींच्या तालावर नाचत असल्याने लाडक्या बहिणींचे संसार उध्वस्त झाले असुन धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रे बंद करावीत अशी मागणी महिलांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. कला केंद्र व तिथली स्तिथी, नियमित तपासणी याचा आढावा जिल्हा प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. मंजुर व नवीन प्रस्तावाना ग्रामपंचायत, ग्रामसभा, ग्रामसेवक व तंटामुक्त समितीने दिलेल्या नाहरकत व इतर कागदपत्रे तपासण्याची गरज आहे.
बहरलेली काही कला केंद्र व तिथले वातावरण पाहून नवीन कला केंद्राचे 5 प्रस्ताव दाखल झाले असुन तितकेच प्रस्तावित टोलेजंग इमारतीसह प्रतीक्षेत आहेत. नाहरकत, परवानगीसाठी मोठे ‘दरपत्रक’ असुन नवीन परवान्याबाबत प्रशासन काय ठोस भुमिका घेते हे पाहावे लागेल. ‘जीएसटी क्रमांक’ असणे व तो कर भरणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगितले जाते मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
नियमित आर्थिक देवाण घेवाणीवर व व्यवहारावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही, डोक्यावर हात ठेवुन ‘सब माल अंदर’ अशी स्तिथी आहे. नर्तकींना तुटपुंजे पैसे देऊन उर्वरित लाभ कला केंद्र मालक घेऊन ‘गडगंज’ झाले आहेत. कला केंद्राना प्रशासकीय व राजकीय पाठबळ मिळत असल्याने जाळे वाढले आहे. महिन्याला आर्थिक हप्त्याची न चुकता पेशगी दिली जात असल्याने कारवाई ऐवजी संरक्षण दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत.

काही कला केंद्र व तिथल्या काही नर्तकीमुळे ग्रामीण भागातील तरुणाई पिंजऱ्यात अडकली असुन पैसे उधळणे, व्यसनामुळे कुटुंब अक्षरशः आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाली आहेत. कला केंद्रातील गैरप्रकारामुळे महिला आक्रमक झाल्या असुन त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा स्वाती गोरख जोगदंड जगताप व इतर महिलांनी दिला आहे. पिंजरा फिल्म सारखी स्तिथी झाली असुन मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या अनेक लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त झाले असुन तरुण व्यसनांध झाले असल्याचा आरोप जोगदंड जगताप यांनी केला आहे. समाजातील काही प्रतिष्ठित या व्यवसायात उतरले असुन त्यांनी ‘आत्मचिंतन’ करणे गरजेचे आहे.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई व चोराखळी येथील महाकाली या बहुचर्चित वादग्रस्त कला केंद्रावर प्रशासन कारवाई कधी करणार हा प्रश्न विचारला जात आहे. कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र तो मंजुर केला नाही, असे असतानाही तुळजाभवानी व येडेश्वरी देवीच्या फोटोसह इथे सगळी सजावट करून हे कला केंद्र सज्ज झाले आहे. परवानगी पुर्वी इतकी हिम्मत व ‘विश्वास’ येतो कुठून ?
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.