उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट एका दिवसात 38.60 टक्क्यावरून थेट 18.82 टक्के ? आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकातील आकडेवारी – श्रेय घेण्याची गडबड कोणाला ?
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग एप्रिल व मे महिन्यात नक्कीच वाढला आहे त्यामुळे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे व आता सध्या ते काही प्रमाणात कमीही होत आहे हे तपासणीच्या आकडेवारीवरून दिसत आहे मात्र एका दिवसात रुग्ण सापडण्याचा सरासरी दर हा थेट 38 वरून 18 टक्केवर आणण्यासाठी प्रशासनाने कोणता फॉर्म्युला वापरला हा संशोधनाचा विषय आहे.
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय रुग्णालय यांच्या मार्फत कोरोनाबाबत दररोज अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढले जाते यात रुग्ण संख्या, चाचणी, मृत्यू व बरे झालेल्या रुग्णांची दररोजची व कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची गेल्या 14 महिन्याची आकडेवारी दिली जाते. यात वरील धक्कादायक माहिती समोर आली. आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार 18 मे रोजी पर्यंत 2 लाख 65 हजार 267 रुग्णाच्या कोरोना तपासणी करण्यात आली होती त्यापैकी 49 हजार 903 रुग्ण कोरोना बाधीत सापडले व पॉझिटिव्हीटी रेट हा 38.60 टक्के दाखविला गेला आहे तर 20 मे रोजीपर्यंत 2 लाख 69 हजार 997 तपासणी झाल्या त्यात 50 हजार 886 रुग्ण सापडले व पॉझिटिव्हीटी दर हा 18.84 टक्के असा दाखविण्यात आला. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत आघाडीवर असल्याची चर्चा असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याची सरासरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 मे च्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या आदल्या दिवशी अचानक कमी झाल्याचा प्रकार उघड झाल्याने या बाबीकडे लक्ष गेले.
दिशाभुल करणारी चुकीची आकडेवारी – 35 ते 38 आकडा आलाच कुठून ?
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर लोकप्रतिनिधी व प्रसार माध्यम यासह इतर ठिकाणी कोरोना सादरीकरण करताना सांगतात की उस्मानाबादचा पॉझिटिव्हीटी दर हा 35 ते 38 टक्क्यावरून 18 टक्के म्हणजे निम्यावर आला. मुळात उस्मानाबादचा सरासरी व दैनिक पॉझिटिव्ह दर हा कोरोनाची दुसरी लाट असताना एकही दिवस 35 ते 38 टक्के नव्हता असे आरोग्य विभागाच्या प्रेस आकडेवारीची टक्केवारी काढली तर स्पष्ट होते. मग हा 35 ते 38 टक्केचा आकडा आलाच कुठून हा संशोधनाचा विषय आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग वाढायला सुरुवात झाली या महिन्यात 53 हजार 970 रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आल्या त्यात 14 हजार 840 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले म्हणजे सरासरी 27.49 टक्के तर 9991 आरटीपीसीआर चाचणी करण्यात आल्या. एप्रिल महिन्यात एकूण 63 हजार 961 चाचण्या झाल्या त्यात 17 हजार 813 रुग्ण सापडले म्हणजे 27.84 टक्के एप्रिल महिन्याचा सरासरी पॉझिटिव्हीटी दर होता तर 1 मे ते 20 मे या काळात 41 हजार 904 रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आल्या त्यात 12 हजार 538 रुग्ण सापडले म्हणजे या काळात सरासरी पॉझिटिव्ह दर हा 22.01 टक्के आहे. पॉझिटिव्हीटी दरचा 35 ते 38 टक्केचा आकडा आलाच कुठून याचे उत्तर प्रशासनाकडून अपेक्षीत आहे.
या आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्ण कमी
14 मे पासून उस्मानाबाद जिल्ह्यात रॅपिड अँटीजन तपासणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे. 14 मे 22.14 टक्के, 15 मे 18.97,16 मे 19.18, 17 मे 19.40, 18 मे 16.91, 19 मे 18.89 तर 20 मे 17.53 टक्के रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत तर मे महिन्याची आजवरची सरासरी 22.01 टक्के आहे. आकडा कमी झाला तरी गाफील राहण्याचे कारण नसुन अजूनही संकट टळलेले नाही, रोज 8 ते 12 मृत्यू होत आहेत. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
आकडेवारीत असा घातला गेलाय घोळ
जिल्हा प्रशासनाच्या प्रसिध्दी पत्रकमधील आकडेवारीची टक्केवारी काढली तर घोळ समोर आला आहे. गेल्या 1 एप्रिल पासून म्हणजे 50 दिवसापासून प्रशासन प्रसिद्धी पत्रकात आजवरची सरासरी पॉझिटिव्हीटी टक्केवारी चुकीची देत जनता,लोकप्रतिनिधी व प्रसार माध्यमांची दिशाभूल करीत होते. हेच प्रसिद्धी पत्रक व आकडेवारीवर वृत्तपत्र व सोशल मीडियावर पोस्ट केली जात होती. या चुकीच्या टक्केवारीमुळे अनेक नागरिक भयभीत व चिंताग्रस्त होत होते. 1 एप्रिलपर्यंत 1 लाख 58 हजार 893 तपासण्या झाल्या त्यात 20 हजार 818 रुग्ण सापडले म्हणजे 13.10 टक्के मात्र प्रसिद्ध पत्रकात 16.14 टक्के दाखविले गेले आणि येथूनच सरासरी टक्केवारी वाढवून दाखवण्याचे सत्र सुरू झाले. 1 मेपर्यंत 2 लाख 22 हजार 401 तपासण्या झाल्या व त्यापैकी 39 हजार 015 रुग्ण म्हणजे 17.54 टक्के रुग्ण सापडले मात्र जिल्हा प्रशासनाने प्रेस प्रसिद्धी पत्रकात 29.93 टक्के म्हणजे प्रत्यक्ष टक्केवारीच्या 12 टक्के अधिक दाखविले. हद्द तर यानंतर वाढतच गेली 17 मे पर्यंत 2 लाख 63 हजार 076 रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यात 49 हजार 503 रुग्ण सापडले म्हणजे सरासरी 18.81 टक्के मात्र प्रसिद्धी पत्रकात तब्बल 38.19 टक्के पॉझिटिव्हीटी दर दाखविण्यात आला जो प्रत्यक्ष सरासरीच्या दुपट्टपेक्षा अधिक 20 टक्क्यांनी होता. 19 मे ला मात्र यात सुधारणा करून 18.82 टक्के व 20 मे ला 18.84 टक्के सरासरी दाखविण्यात आली जी आकडेवारीनुसार योग्य आहे
टक्केवारी कोणत्या फॉर्म्युलाने काढली व चुकवली की श्रेयवाद ?
35 ते 38 टक्के रोज वाढता सरासरी पॉझिटिव्हीटी रेट प्रसिद्धी पत्रकात येत असल्याने सर्व जनता लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणा चिंतेत होती. 1 मे पासून कागदावर सरासरी 30 टक्के झाले व तिथून तो प्रवास 18 मे पर्यंत 38.60 टक्केपर्यंत गेला , ही टक्केवारी नेमकी कोणत्या फॉर्म्युला वापरून काढली गेली हे प्रशासनाने स्पष्ट करावे व वाढीव सरासरी टक्केवारी दाखवून अचानक सत्य आकडे समोर आणून कोरोना रुग्णांचा सरासरी पॉझिटिव्हीटी दर कमी केल्याचे श्रेय तर या धडपडीतून घ्यायचे नसेल ना ? ही शंका या प्रकारातून येते.
एरव्ही काही प्रशासकीय अधिकारी गोळाबेरीज व टक्केवारी काढण्यात अनुभवी व तज्ञ असतात मात्र कोरोना सारख्या गंभीर स्तिथीत ही टक्केवारी चुकतेच कशी हा प्रश्न आहे. कोरोना संसर्ग व इतर विषयावर नियंत्रण ठेवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या नेमणुका व जबाबदाऱ्या दिल्या असतानाही एकाही अधिकारी व पडताळणी स्तरावर ही बाब लक्षात येऊ नये याचेच आश्चर्य वाटते.
काही गोंडस कारणाने नकारात्मक प्रकाराकडे हेतूत दुर्लक्ष
कोरोना संकट हे नवीन व दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे या काळात लढा देण्यासाठी पर्याप्त यंत्रणा, वैद्यकीय व तांत्रीक सुविधा व मनुष्यबळ तुलनेत कमी आहे सर्वजण प्रयत्न करीत असताना काही जण मात्र गंभीर चुका, दुर्लक्ष आणि आर्थिक संधीसाधूपणा उघडपणे करीत आहेत. वाघोली मृतदेह अदलाबदली, कोरोना मृत्य संख्या नगर परिषद अंत्यविधीशी न जुळणे हे प्रकार यातील काही उदाहरणे आहेत. जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यांना या बाबी माहीत असताना कोणतीही कारवाई न करणे अशा प्रवृत्तीना प्रेरणा देणारे आणि हतबलता दर्शविणारी बाब आहे जी भविष्यात घातक आहे. मनुष्यबळ कमी , तांत्रिक अडचण ही गोंडस कारणे पुढे करून काही बाबी लपविणे व त्यावर पांघरूण घालण्याचे प्रकार वाढत आहेत. कोरोना काळात सकारात्मक विचार व त्याचा प्रचार आणि प्रसार करताना काही चुकीच्या बाबींना अभय मिळत असल्याने व त्याकडे माहीत असताना दुर्लक्ष केले जात असल्याने नकारात्मकतेची बीजे खोलवर रुजली जात आहेत ज्याचा दूरगामी परिणाम व्यवस्थेवर होणार आहे.
असा आहे आठवडा सरासरी पॉझिटिव्हीटी रुग्ण दर
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची लाट सर्वोच्च स्थानी असताना आठवडा पॉझिटिव्हीटी दर हा 30 टक्के पेक्षा कमीच होता. 2 एप्रिल ते 8 एप्रिल या काळात 24.6 टक्के, 9 एप्रिल ते 15 एप्रिल 28.7, 16 एप्रिल ते 22 एप्रिल 29.1, 23 एप्रिल ते 29 एप्रिल 27.7, 30 एप्रिल ते 6 मे 27 टक्के,7 मे ते 13 मे 26.6 व 14 मे ते 20 मे या काळात तो 21.3 टक्के आहे.