उद्या जामीनावर निकाल – वसंतदादा बँकेचे चेअरमन व संचालक फराराच, ठेवीदारांना कोट्यावधीचा गंडा – आपण यांना पाहिलेत का ?
दंडनाईक कॉम्प्लेक्समध्ये थाटले कागदोपत्री उद्योग – बोगस फर्मच्या नावाने कर्ज तर आर्थिक लाभाचे धनी चेअरमन
धाराशिव : समय सारथी
धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेने करोडो रुपयांचा गंडा ठेवीदारांना घातला असुन या घोटाळ्यातील मुख्य आरोपी तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते यांच्यासह संचालक मंडळाच्या अटकपुर्व जामिनीवर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे, उद्या यावर निकाल येणार असल्याचे बोलले जात आहे. कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी सध्या उजळ माथ्याने शहरात फिरत असुन ते पोलीस व तपास यंत्रणेला सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांना सापडेनात ? आपण यांना पाहिलेत का ? असाच प्रश्न आता ठेवीदार विचारत आहेत. अनेक ठेवीदार यांचे संसार यामुळे उघड्यावर आले आहेत.
दंडनाईक कॉम्प्लेक्समध्ये कागदोपत्री अनेक उद्योग थाटले गेले व ते सुरु असल्याचे दाखवत कर्ज लाटले.एकप्रकारे जणू दंडनाईक कॉम्प्लेक्स इथे कागदावर उद्योगनगरी स्थापन केली गेली असेच चित्र आहे. बोगस फर्मच्या नावाने कर्ज वाटप केले गेले तर आर्थिक लाभाचे धनी चेअरमन व त्यांचे निकटवर्तीय ठरले. बँक घोटाळा पचवण्यासाठी दंडनाईक हे काँग्रेसमधुन भाजप वासीय झाल्याचेही बोलले जात आहे.
तत्कालीन संचालकामध्ये सीए असलेले भीमराव ताम्हाणे, प्रसिद्ध वकील अॅड. दयानंद बिराजदार, इंजिनियर प्रदीप मुंडे यासह सुरेखा विजय उर्फ विजयकुमार दंडनाईक, महादेव श्रीपती गव्हाणे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बाबूराव आकोसकर, विष्णूदास रामजीवन सारडा, पृथ्वीराज विजय दंडनाईक, रामलिंग धोंडीआप्पा करजखेडे, ईलाही फरीदसाब बागवान, हरिश्चंद्र पंढरीनाथ शेळके यांसह इतरांचा समावेश आहे. काही जणांनी कोर्टात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे मात्र ते उघडपणे फिरत आहेत.
वसंतदादा बँकेचे चेअरमन, काही संचालक व कर्मचाऱ्यानी संगणमत करून कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे नावे बनावट फर्म बनवून पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. जवळच्या जवळपास 200 लोकांना लाखो रूपयांचे कर्ज वाटले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जाची रक्कम 9 वर्षाचा कालावधी लोटला तरी वसूल केली नाही त्यामुळे बँक बुडाली आहे. संशयित बनावट फर्म प्रोप्रायटरचे वसंतदादा बँकेतील बचत खाती काढलेली तारीख एकाच दिवशीची आहे. त्यांचे बचत खाते क्रमांक सीरीयलमध्ये एकाखाली एक आहेत. सर्वांचे फर्मचे पत्ते दंडनाईक कॉम्पलेक्स असे आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ करीत आहेत. ठेवीदार संरक्षण कलम लागल्याने जेलवारी निश्चित मानली जात आहे.
रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी दिसून आल्याने वसंतदादा बँकेचा बँकींग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. परिणामी वसंतदादा बँकेचे मोठे ठेवीदार अडचणीत आले.