आरोप चुकीचे, कायदेशीर लढा देणार – ठेवीदारांनी कोणताही संभ्रम न बाळगता संयम ठेवावा
वसंतदादा नागरी बँक प्रकरणी चेअरमन विजय दंडनाईक व ऍड अमोल वरुडकर यांचा खुलासा
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या बाबतीत केलेले आर्थिक गैरव्यव्हाराचे आरोप चुकीचे असुन या प्रकरणात आम्ही योग्य कायदेशीर मार्गाने लढा देणार असुन ठेवीदारांनी कोणताही संभ्रम न बाळगता संयम ठेवावा असे आवाहन चेअरमन विजय दंडनाईक व त्यांचे वकील ऍड अमोल वरुडकर यांनी संयुक्तरित्या केले आहे.
वसंतदादा नागरी सहकारी बँक 6 ऑगस्ट 1997 पासुन भारतीय रिझर्व बँक यांच्या परवानगीने धाराशिव जिल्ह्यात कार्यरत होती. रिझर्व बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमानुसार व कायदाप्रमाणे बँकेचे कामकाज सुरु होते. बँकेचे सर्व व्यवहार सुरक्षितपणे सुरु असताना केवळ थकीत कर्जाचे प्रमाण वाढल्यामुळे भारतीय रिझर्व बँकेने 13 नोव्हेंबर 2017 रोजी बँकेच्या आर्थिक व्यव्हारावर 35 अ प्रमाणे निर्बंध लाधले व ते निर्बंध वेळोवेळी वाढविण्यात आले. सदरील निर्बंध काढून बँकेचे व्यवहार पुर्वपदावर यावे यासाठी बँकेने निर्बंध काळात 26 कोटी 95 लाख रुपये कर्जाची वसुली केली परंतु भारतीय रिझर्व बँकेने 31 मार्च 2019 च्या आर्थिक परीस्तिथीचा दाखला देऊन 11 जानेवारी 2019 रोजी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला. 31 मार्च 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत बँकेने 14 कोटींची वसुली केलेली असताना या आर्थिक प्रगतीचा विचार न करता परवाना रद्द केला. परवाना रद्दच्या दिनांकास बँकेकडे 34 कोटी रुपये तरलता शिल्लक होती. तसेच 50 कोटी कर्ज येणे होते व 52 कोटी 70 लाख रुपयांच्या ठेवी होत्या अशी स्तिथी असतानाही भारतीय रिझर्व बँकेने सदरील बँक अवसायनात काढली व ठेवी विमा संरक्षण नियमानुसार 5 लाखांपर्यंतच्या सर्व ठेवी देण्यात आल्या. 38 हजार 160 ठेवीदारांना ठेवीची रक्कम देण्यासाठी लागणार 32 कोटी 83 लाख रुपये निधी बँकेकडे शिल्लक होता व त्यानुसार 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवीदारांना 29 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे तसेच 5 लाखावरील सर्व ठेवीदारांना प्रत्येकी 1 लाख 60 हजार प्रमाणे 2 कोटी 63 लाख वितरित करण्यात आले आहेत.
बँकेने कार्यकाळात कोणालाही आमिष दाखविले नाही, सर्वांना समान नियमाप्रमाणे ठरलेल्या व्याजदराप्रमाणे ठेवी स्विकारल्या व त्या व्याजासहित परत केलेल्या आहेत. आजच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन ही संस्था पुन्हा जिल्ह्यात कार्यरत व्हावी यासाठी राहिलेल्या 139 ठेवीदारापैकी 103 ठेवीदारांनी संमतीपत्र दिले आहे त्याप्रमाणे सर्व ठेवीदारांना संमती पत्रात विहित केल्याप्रमाणे ठेवी परत करण्यासाठी पतसंस्थेत रूपांतर करुन कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा खुलासा दंडनाईक यांच्या वतीने ऍड अमोल वरुडकर यांनी केला आहे.
वसंतदादा बँकेने कर्जासाठी पुरेशे तारण न घेता बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करुन त्या कर्जाच्या रकमा चेअरमन व त्यांचे नातेवाईक यांच्या फायद्यासाठी स्वत:चे खात्यावर घेवून स्वत:साठी वापरल्या तसेच कर्ज वाटपाची वसुलीही करण्यात आलेली नाही. प्रभात सहकारी पतपेढी यांना मुदत ठेवीवर जास्त व्याजाचे अमिष दाखवून ठेवीची मुदत पुर्ण होवुन देखील मुदत ठेवीची 1 कोटी 81 लाख व व्याज असे 2 कोटी 31 लाख 68 हजारांची व इतर ठेवीदारांचा विश्वासघात करुन फसवणूक केली अशा मजकुराच्या फिर्यादी दिल्याने कलम 420, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदाररंचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणातील आरोप चुकीचे असुन यात योग्य तो कायदेशीर मार्गाने लढा देऊ. आज रोजी देखील बँकेची परिस्थति भक्कम असून बँकेस देणे 18 कोटी असून बँकेचे कायदेशीर येणे 66 कोटी रुपये आहे त्यामुळे ठेवीदारांनी कोणताही संभ्रम न बाळगता संयम ठेवावा असे आवाहन विजय दंडनाईक व ऍड अमोल वरुडकर यांनी केले आहे.