‘आरोग्य पर्व’ – मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यामुळे ‘ आरोग्य क्रांती ’
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाचा 1 कोटींचा टप्पा पार
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील महिलांचा ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रापासून सुरू असलेल्या या अभियानात आतापर्यंत सुमारे 1 कोटी 5 लाख महिलांची तपासणी करण्यात आली आहे. हे अभियान 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे व पुढेही पाठपुरावा केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी सांगितले. राज्यातील 4 कोटी 66 लाख 69 हजार महिला पैकी 1 कोटी 5 लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून सर्व महिलांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून कामाला लागली आहे. आरोग्यात महाराष्ट्राला देशात नंबर 1 बनविण्याचा संकल्प डॉ. सावंत यांनी केला आहे.
राज्यात 18 वर्षावरील महिला, माता, गर्भवती यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक 26 सप्टेंबर पासून आरोग्य तपासणी कार्यक्रम एकात्मिक बाल विकास विभाग व इतर विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील महिलांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यातील 18 वर्षावरील महिलांना, मातांना, गर्भवतींना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे उद्दिष्ट आहे.
सर्व शासकीय दवाखान्यात सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान वैद्यकिय अधिकारी आणि स्त्री रोगतज्ञामार्फत 18 वर्षावरील महिलांची, नवविवाहीत महिला, गर्भवती यांची तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या अभियानाची सुरवात करण्यात आली. आशा व अंगणवाडी आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
तीस वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधूमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान-नाक-घसा व इतर आजारांचे निदान करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये अतिजोखमीच्या मातांचे व महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील, याचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच भरारी पथका मार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणार्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम आखण्यात येत आहेत. यासाठी अंगणवाडी आणि आशा सेविका यांना जास्तीत जास्त महिला व माता यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियानाचे यश व तपासणीची आकडेवारी
आतापर्यंत एकूण 1,05,30,118 महिलांची तपासणी करण्यात आली.
30 वर्षावरील 94 हजार 234 महिलांना मधुमेह तर 1 लाख 56 हजार 504 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान.
10 लाख 38 हजार 945 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 45 हजार 732 मातांना उच्च रक्तदाब
तीव्र रक्तक्षय असलेल्या 38 हजार 509 मातांना आयर्न सुक्रोज तर 1 लाख मातांची सोनोग्राफी
30 वर्षावरील 12 हजार महिलांना हृदयासंबंधित आजार तर 20 हजार 505 महिलात कर्करोगाची संशयित लक्षणे
26 लाख 55 हजार 310 लाभार्थ्यांना मानसिक आरोग्य, तंबाखू सेवन करु नये, याबाबत समुपदेशन करण्यात आले