अद्यादेश जारी – कोरोनाने मृत्यू झाल्यास मिळणार 50 हजार सानुग्रह मदत
रुग्णालयात, घरी व आत्महत्या केली तरी मिळणार अनुदान, वाचा नियमावली
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोनाने निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात अध्यादेश राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने जारी केला असून यासाठी आवश्यक कागदपत्रांची सूची जाहीर केली आहे. कोरोनाच्या काळात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना किंवा निकटवर्तीयांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने याबाबतचा अध्यादेश 26 नोव्हेंबर रोजी जारी केला आहे, त्यानुसार कोरोनाने निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे.आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थींच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे असे आदेश महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी काढले आहे
ज्या रुग्णांना आरटीपीसीआर, मॉलिक्युलर टेस्ट तसेच रॅपिड एंटीजन चाचणीतून कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्या रुग्णांचा यात समावेश केला जाणार आहे. कोरोना अहवाल आल्यापासून 30 दिवसाच्या आत किंवा 30 दिवसाच्या नंतर रुग्णालयात तसेच रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही मदत देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर घरी झाला असला तरी किंवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असली तरी त्यांच्या वारसांना रक्कम दिली जाणार आहे.
ज्या व्यक्तींचा मृत्यू घरी झाला आहे व वैद्यकीय प्रमाणपत्र कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे दिले असेल तर त्यांना पात्र ठरविले जाणार आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने अद्याप वेबसाईट व इतर माहिती प्रसारित केली नसून ती लवकरच देण्यात येईल असे सांगितले आहे.
अर्ज दाखल करताना अर्जदाराने स्वतःचा तपशील, आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील,मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, इतर नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र याबाबी ऑनलाईन द्यावयाचे आहेत.
मृत पावलेल्या व्यक्तीचे आधाराचा तपशील आरोग्य विभागाच्या तपशिलाशी जुळल्यानंतर संगणकीय प्रणालीवर अर्ज स्विकारण्याची कारवाई केली जाईल. ज्यांचा ऑनलाइन डेटा जुळणार नाही असे अर्ज जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवले जातील. अस्वीकृत अर्जावर सुनावणीची तरतुदी ठेवण्यात आलेली आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सूचना व हरकती मागविल्या जातील व त्यानंतर सात दिवसांनी हे अनुदान खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा होईल
वेबसाईट व पोर्टल कार्यान्वित झाल्यावर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याबाबतची आवश्यक ती प्रसिद्धी देतील व संबंधितांना ऑनलाइन अर्ज करण्याचे अहवाल आवाहन करतील असे आदेशात नमूद केले आहे.