अतिवृष्टी – 2 दिवसात 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल
शेती,रस्ते,जनावरे,घरांची पडझड- शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा
केंद्र व राज्य सरकारने आरोप प्रत्यारोप पेक्षा भरीव मदत करणे गरजेचे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात 27 व 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुल विभागाने तयार करून सरकारकडे पाठविला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मदतीकडे मोठ्या आशेने नजरा लागल्या आहेत. हा प्राथमिक अंदाज असून यापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले असुन पंचनामे व पाहणी सुरू आहे. शेती,रस्ते,जनावरे,घरांची पडझड झाली असुन पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हात तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे.शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असुन शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे.केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता व राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे.या अतिवृष्टीचा फटका 2 लाख 88 हजार 137 शेतकऱ्यांना बसला असुन 2 लाख 66 इतक्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 146 कोटी 35 लाख 46 हजार 200 रुपये इतका निधी अपेक्षित आहे. पुरामुळे अनेक गावातील रस्ते महामार्ग खराब झाले असून 134 किलोमीटर मार्गाचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी 51 कोटी 71 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. त्यात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 82.10 किमी रस्त्यासाठी 22 कोटी 49 लाख तर जिल्हा परिषदेच्या 51.80 किमी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 29 कोटी 22 लाख रुपये लागणार आहेत. पुराने इतके रौद्ररूप धारण केले होते की त्यात 109 पुलांचे मोठे नुकसान झाले त्यातील अनेक पूल खचले तट काही पुल वाहून गेले त्यांच्या दुरुस्तीसाठी 38 कोटी 76 लाख रुपयांचा निधी लागणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे 44 पुलांचे 29 कोटी 61 लाख तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे 65 पुलांचे 9 कोटी 15 लाख नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे 5 तलाव फुटण्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेती वाहून गेल्याने झाले आहे.या तलावाच्या दुरुस्तीसाठी 80 लाख लागणार आहेत.पुरात महावितरणच्या पोल, डीपी व इतर पायाभूत सुविधांचे 1 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुरात वाहून गेल्याने 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांना 8 लाख मदत देणे अपेक्षित आहे लहान मोठी अशी 110 जनावरे मयत झाली असून त्याची भरपाई म्हणून 33 लाख निधींची गरज आहे. पावसाने व पुराने नदी काठच्या घरासह इतर घराची मोठी पडझड झाली, 1 हजार 87 घरांची पडझड झाली असून त्यांना 65 लाख 22 हजार मदत करने गरजेचे आहे. अतिवृष्टीच्या काळात जवळपास 500 च्या वर लोकांना पुरातुन वाचविण्यात आले अश्या प्रकारे 278 कोटी 96 लाख 2 दिवसात नुकसान झालं आहे.