अंतीम संधी, संचिका गहाळ प्रकरण – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांचा कारवाईचा इशारा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीला अभिलेखे सादर न केल्याप्रकरणी आता कारवाईला गती आली आहे. चौकशी समितीने अहवालात ठपका ठेवलेली 17 कोटींची रक्कम आर्थिक अपहार केला आहे असे समजून फौजदारी गुन्हा का नोंद करू नये अशी नोटीस जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावली होती मात्र काही जणांनी खुलासा मोघम स्वरूपाचा दिला आहे तर काहींनी अद्याप सादर केला नसल्याची बाब गंभीर स्वरूपाची आहे असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.
9 जुन पर्यंत गहाळ संचिका संबंधित व्यक्तींनी स्वतः नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे स्वतः उपस्थितीत राहुन सादर करण्यास अंतीम संधी दिली आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी करण्यात आली तसेच हे प्रकरण विधिमंडळात चांगलेच गाजले होते.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, नगर अभियंता दत्तात्रय कवडे, नवनाथ केंद्रे, भारत विधाते, संदीप दुबे, स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे, लेखापाल सुरज बोर्डे व प्रशांत पवार या 8 जणांना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे अंतीम नोटीस बजावली आहे. यातील केंद्रे हे सध्या लातूर, बोर्डे बुलढाणा व पवार हे यवतमाळ येथे आहेत तर कवडे, कांबळे व विधाते हे सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक जण बदलून गेले आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहेत.
धाराशिव नगर परिषदेचे प्राप्त तक्रारी व इतर आर्थिक बाबीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. प्राप्त अहवालानुसार नमूद रक्कम अपहार समजून महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेखे अधिनियम 2005 चे कलम 9 नुसार कारवाई का करू नये ? यासह प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला आहे.
गहाळ संचिका यांचा केंद्र बिंदू कुठे आहे याची चर्चा होत आहे. दरम्यान अनेक संचिका ह्या संबंधित कर्मचारी व काही ठेकेदार यांच्याकडे असल्याची माहिती आहे तर अपुऱ्या कागदपत्रावर संचिका तयार करण्यासाठी धावपळ सुरु आहे, संचिका न सापडल्यास कर्मचारी यांच्यासह संबंधित ठेकेदार कायदेशीर अडचणीत येऊ शकतात. संचिका नसल्याचे प्रकरणी अनेक जण रडारवर असुन ते आता चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे.
खुद्द जिल्हाधिकारी यांनी फौजदारीचा इशारा देऊनही काही जणांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही.