फसवणूक केलेल्या 3 ठेवीदारांची 25 टक्के रक्कम दंडनाईक यांनी कोर्टात भरली – अरविंद नागरी पतसंस्थेचा घोटाळा
उर्वरित 25 टक्के सोमवारी भरणार – इतर 6 ठेवीदारांची 4 कोटींची रक्कम मिळण्याची आशा पल्लवीत – पिग्मी घोटाळा उघड
धाराशिव – समय सारथी
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेने केलेल्या फसवणूक प्रकरणात चेअरमन रोहित दंडनाईक यांनी गुन्हा नोंद केलेल्या 3 ठेवीदार यांच्या मूळ मुदतठेव रकमेतील 25 टक्के रक्कम कोर्टात डी डी ने जमा केली असुन उर्वरित 25 टक्के रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार 11 सप्टेंबर रोजी जमा केली जाणार आहे.याची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.
गुन्हा नोंद झाल्यानंतर जवळपास 6 ठेवीदार यांनी समोर येत अरविंद बँकेने फसवणूक केल्याची पोलिसात लेखी तक्रार केली असुन त्यांची अंदाजे 4 कोटी रुपयांची मुदतठेव रक्कम यामुळे मिळण्याची आशा यानिमित्ताने पल्लवीत झाली आहे. गेली 8 ते 9 वर्षांपासुन अनेक ठेवीदार यांची मुदत संपूनही रक्कम मिळालेली नसुन हा आकडा कोटींच्या घरात आहे.
दंडनाईक यांना कोर्टाने अटकपुर्व जामिन अर्जाच्या अंतीम सुनावणीपर्यंत धाराशिव जिल्हा कोर्टाच्या परवानगीशिवाय सोडून जाऊ नये यासह पोलिसांना तपासात मदत करण्याचे आदेशीत केले आहे.
गोरगरीब लोकांनी रोज पै पै भरलेल्या पिग्मीच्या रकमेसह मुदत ठेवीची रक्कम मुदत संपली तरी अनेक ठेवीदार यांना गेली 8 ते 9 वर्षांपासुन दिल्या नाहीत त्यामुळे मुदतठेव सोबत पिग्मी घोटाळा उघड झाला आहे. पोलिसात गुन्हा नोंद होताच अटकेच्या भीतीने दंडनाईक यांनी ठेवीदार यांच्या रकमेच्या 50 टक्के पैसे भरण्याची तयारी दाखविल्याने चेअरमन रोहितराज दंडनाईक यांना कोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरता दिलासा दिला आहे. या प्रकरणात ऍड मिलींद पाटील, ऍड अमोल वरुडकर आरोपीच्या वतीने काम पाहत आहेत तर तक्रारदार ठेवीदार यांच्या वतीने ऍड अजित खोत यांनी कोर्टात वकीलपत्र दाखल केले आहे.
अरविंद बँकेचे चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळावर तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409,120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद असलेल्या 10 लाख 25 हजार रकमेतील 25 टक्के रक्कम कोर्टात भरली आहे. ही 10 लाख 25 हजार रक्कम गेल्या 9 वर्षांपासुन मिळालेली नसुन त्याची 14 टक्के व्याजासह रक्कम 35 ते 40 लाखात जाते, ती ठेवीदार यांना मिळणे अपेक्षित आहे.या घोटाळ्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अरविंद पतसंस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहार, कागदपत्रे याची चौकशी करीत आहेत.
पतसंस्थेच्या लेखापरीक्षणात घोळ उघड – कारवाईची टांगती तलवार
अरविंद पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत त्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.