धाराशिव – समय सारथी
पर्यावरण संरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन मोहिम राबविण्यात येणार असुन 19 जुलैला धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे जागतिक रेकॉर्ड होणार आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतुन हा प्रकल्प राबवीला जाणार असुन या अंतर्गत वृक्षाना क्यू आर कोड लावण्यात येणार असुन संवर्धनासाठी वृक्ष मित्र नेमण्यात येणार आहेत. 10 नगर पालिका क्षेत्र व 284 ग्रामपंचायत ठिकाणी 5 हजार 702 हेक्टर क्षेत्रावर 17 लाख 18 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. लागवड केलेल्या वृक्ष ठिकाणी अधिकारी व सामाजिक संस्थांनाचे प्रतिनिधी भेट देतील व स्तिथी पाहतील त्यानंतर पुन्हा वर्षभर वारंवार भेट देऊन वृक्षसंवर्धन करतील अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष उपस्थितीत होते.
घनवन वृक्षारोपण अंतर्गत एका चौरस मीटरमध्ये 3 झाडे असे 1 हेक्टरमध्ये 30 हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार असुन यात आंबा, सिताफळ, आवळा, पिंपळ, वड, तुळस, लिंब, शेवगासह महावृक्ष, फळझाडे, औषधी वनस्पती असणार आहेत. ग्रामपंचायत, नगर परिषद, वनविभाग, महसूल असे विभाग यात सहभागी असणार असुन विविध सामाजिक संस्थाचे योगदान असणार आहे. पत्रकार परिषदेला (रोहयो) प्रवीण धरमकर,विभागीय वन अधिकारी बी.एस.पोळ,सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी व्ही.के.करे उपस्थितीत होते.
वृक्षांना क्यु आर कोड बसविण्यात येणार असून ही वृक्ष लागवड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्वांना दिसणार आहे.10 आर क्षेत्रासाठी 10 वृक्ष मित्र आवश्यक असून क्षेत्राप्रमाणे त्याची संख्या वाढणार असल्याचे पुजार यांनी सांगितले. क्यूआर कोड दिल्याने त्या झाडाची स्तिथी कळणार असुन लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धन याला महत्व दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.ज्या ठिकाणी पाण्याचा शास्वत स्रोत आहे त्या ठिकाणी व जिथे कुंपण व्यवस्था आहे त्या ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहेत. मियावोकी लागवडमुळे वन क्षेत्र वाढणार असुन त्या ठिकाणी नंतर गार्डन व इतर नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने यामुळे परिसराच्या सौन्दर्यात भर पडणार आहे, शिवाय पर्यावरणपुरक वातावरण निर्माण होणार आहे.
नियोजन बैठकीला सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागृतीसाठी शालेय स्तरावर लेझीम,गीत व इतर कार्यक्रम तर जिल्हास्तरावर गोंधळी गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर वृक्ष लागवड स्थळी मंडप उभारुन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे पुजार यांनी सांगितले.