धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील कोल्हेगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खुन केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
श्रीकृष्ण तुकाराम टेकाळे (वय 35) हे पत्नी साक्षी टेकाळे (वय 28) हिच्यासोबत कोल्हेगाव येथे राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह दीड-दोन वर्षांपूर्वी झाला होता. दोघात किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद चिघळल्यावर संतापलेल्या श्रीकृष्ण यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये साक्षीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मानसिक तणावाखाली श्रीकृष्ण यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी धाव घेत धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाल्याची माहिती असून, त्यातील मजकूर अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.