167 चारा छावण्यासाठी 1 हजार 204 कोटी तर 191 टँकरसह पाण्यासाठी लागणार 14 कोटी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणे कोरडी ठाक पडली असल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची स्तिथी गंभीर होणार असुन दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस भीषण होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने सद्य स्तिथी व भविष्यातील उपाययोजना लक्षात घेता पाणी व चाराबाबत गावनिहाय आराखडा तयार केला असुन जवळपास 1 हजार 218 कोटींची मागणी सरकारकडे सादर केली आहे.
डिसेंबर महिन्यानंतर पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाई भासू शकते त्यामुळे जिल्ह्यात 167 चारा छावण्यासाठी 1 हजार 204 कोटी तर 191 टँकरसह पाण्यासाठी 14 कोटी लागु शकतात. ही आकडेवारी प्राथमिक असली तरी यात वाढ होऊ शकते. आर्थिक तरतुदीबरोबरच चारा वाहतुक बंदीसह अन्य बाबींची उपाययोजना सुद्धा केली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले असुन शेती वापरावर बंदी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी विभागीय आयुक्ताकडे पाणी टंचाई आराखडा सादर केला आहे तर पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त डॉ गौरीशंकर हूलसुरे यांनी चारा टंचाईबाबत गावनिहाय व पशुधन आणि त्यासाठी लागणाऱ्या चारा याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंतचा कृती आराखडा तयार केला असुन नागरी भागासाठी 41 लाख तर ग्रामीण भागासाठी 13 कोटी 13 लाखांचा आराखडा तयार केला आहे. 770 वाडी वस्तीसाठी 573 खासगी विहिरीचे अधिग्रहण करणेसाठी 2 कोटी 56 लाख तर 191 टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 कोटी डिसेंबर अखेरपर्यंत लागणार आहेत.
भुम तालुक्यात 31 टँकर, कळंब 35, लोहारा 7, परंडा तालुक्यात सर्वाधिक 70, उमरगा 24, वाशी तालुक्यात 24 टँकर लागणार आहेत तर भुम तालुक्यात 87 खासगी विहिरीचे अधिग्रहण, कळंब 165, लोहारा 20, धाराशिव 39, परंडा 70, तुळजापूर 87, उमरगा 55 व वाशी 50 असे 573 अधिग्रहण करावे लागणार आहे.
30 जुन 2024 पर्यंत धाराशिव जिल्ह्यात 197 दिवस चारा टंचाई भासू शकते त्यामुळे चारा छावणीसाठी 1 हजार 204 कोटी लागु शकतात, या काळात 167 चारा छावणी सुरु करण्याचे नियोजन असुन त्यासाठी प्रतिदिन 5 कोटी 56 लाख 78 हजार इतका खर्च होणार आहे. उमरगा तालुक्यात 32, वाशी 9,परंडा 18, तुळजापूर 30, लोहारा 15,कळंब 18, भुम 26 व धाराशिव तालुक्यात 19 अश्या चारा छावण्या सुरु करण्याचे नियोजन असुन डिसेंबर अखेर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे.
धाराशिव जिल्ह्यात 20 व्या पशुगणनानुसार लहान- मोठी शेळ्या मेंढ्यासह 7 लाख 90 हजार जनावरे असुन त्यात छोटी जनावरे 1 लाख 19 हजार 832, मोठी जनावरे 4 लाख 31 हजार व 2 लाख 39 हजार शेळ्या मेंढ्या आहेत. त्यांना दररोज जवळपास 3 हजार 89 मेट्रिक टन इतका चारा लागतो. चारा छावणी सुरु झाल्यास लहान जनावरे व शेळ्या मेंढी यांना 50 रुपये तर मोठ्या जनावरांना 100 रुपये प्रतिदिन मदत चाऱ्यासाठी दिली जाते.
चाराटंचाई टाळण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून बियाणे वाटप, मुरघास निर्मिती, जलसंधारण विभागाच्या मदतीने गाळपेरा क्षेत्रात चारा पिके घेणे, चारा वाहतूक बंदी व सर्व उपाययोजना करूनही चारा टंचाई भासल्यास चारा छावणी हा अंतीम पर्याय ठेवला आहे.
निधीची मागणी केली, सरकार सकारात्मक – जिल्हाधिकारी
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, लोहारा व वाशी या तीन तालुक्यात राज्य सरकारने गंभीर दुष्काळ जाहीर केला. वेळोवेळी पाणी व चारा याचा आढावा घेऊन तो कृषी आयुक्त, मदत पुनर्वसन विभागसह राज्य सरकारला कळविला जात आहे. कमी पाऊस, पाणी पातळी कमी झाली असुन धरणातील जिवंत उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प आहे. शासन सकारात्मक विचार करीत असून आराखडाप्रमाणे निधीची मागणी केली आहे असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.