घोटाळा करुन जय लक्ष्मी कारखान्यात गुंतवणूक तर ठेवीदारांच्या पैशाचा अपहार – पत्नीच्या बचत गटाच्या नावे कर्ज, सहभाग व आर्थिक लाभ
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपी पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी व कमलाकर बापूराव आकोसकर या 6 जणांचा अटकपूर्व जामीन छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला असुन या सर्वांच्या आर्थिक घोटाळ्यातील सहभागावर कडक ताशेरे ओढले आहेत.
मुख्य आरोपी तथा घोटाळ्याचे सुत्रधार विजय दंडनाईक यांच्यासह संचालकांनी लोकांच्या ठेवीचा अपहार केल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी हा जामीन नाकारला, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून एस पी सोनपावले यांनी शासनाची बाजू मांडली तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ यांनी तपास केला.
वसंतदादा बँकेत ओव्हर ड्राफ्ट, स्वयं रोजगार कर्ज असे बोगस कर्जवाटप करुन करोडो रुपयांची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर घेतली व नंतर ती जयलक्ष्मी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्यात दंडनाईक यांची मुले, पत्नी असा परिवार आहे. सुरेखा दंडनाईक यांच्या बचत गटाला नियमबाह्य कर्ज दिले.
वसंतदादा बँकेतून संशयित स्वयंरोजगार कर्ज, बचत गटाला कर्ज व ओव्हर ड्राफ्ट देताना संचालक मंडळाने कोणतीही कागदपत्रे न घेता मंजुरीचा ठराव घेऊन तात्काळ मान्यता दिली, कर्जवसुल होणार नसल्याचे ज्ञात असतानाही ते वाटप केले आणि जाणीवपूर्वक वसुलीसाठी पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित होतो असे निरीक्षण नोंदविले.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकेच्या कामकाजात अनियमितता झाल्याचे म्हणटले आहे शिवाय ऑडिटर यांनी त्याबाबत गुन्हा नोंदवीला नाही. 350 पैकी 100 ठेवीदार यांनी ठेवी उशिराने घेण्याची तयारी दर्शवली आहे.कर्जवसुलीसाठी 101 ची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. बँकेवर प्रशासक आहे त्यामुळे सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे अटक करण्याची गरज नाही अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मांडली.
रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे की 6 जणांच्या नावे प्रत्येकी 60 लाख रुपयांचा असे 3 कोटी 60 लाख रुपयांचे ओव्हर ड्राफ्ट 12 डिसेंबर 2011 ते 1 जुन 2012 दरम्यान मंजुर केले व त्याच दिवशी ती रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांच्या बचत खात्यात जमा केली. याचं लोकांना प्रत्येकी 55 लाख रुपयांचे स्वयं रोजगार कर्ज मंजुर केले व ते ओव्हर ड्राफ्टमध्ये जमा केले, हे कृत्य आर्थिक अपहार असुन चेअरमन व संचालकांचा यात थेट संबंध आहे.
28 जुलै रोजी गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल दीड महिना झाले असुन चेअरमनसह सर्व संचालक मंडळ फरार आहे. संचालक गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक अर्थात सी ए असलेले भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा फरार असुन पोलिसांचा तपास सुरु आहे.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे गुन्हा नोंद केला आहे.
दंडनाईक परिवाराची संघटीत आर्थिक गुन्हेगारी
विजय दंडनाईक व त्यांच्या परिवाराने वसंतदादा बँक व अरविंद नागरी पतसंस्था अश्या 2 बँका, दूध संघ यांच्यासह जय लक्ष्मी साखर कारखाना बुडविला असुन त्यातून शेतकरी व ठेवीदारांना करोडोचा गंडा घातला आहे. बँका बुडविन्याचा दंडनाईक पॅटर्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. दंडनाईक परिवारावर आर्थिक फसवणूकीचे अनेक गुन्हे यापुर्वी देखील नोंद आहेत. संघटित आर्थिक गुन्हेगारीचा हा एक प्रकार असुन त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने पाठपुरावा केल्यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने व आदेशाने अरविंद बँकेवर सुद्धा गुन्हा नोंद झाला असुन अनेक रंजक माहिती समोर येत आहे.