धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य आरोपी विजय नाना दंडनाईक यांचा जामीन जिल्हा कोर्टाने नाकारल्यानंतर त्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला असुन त्यावर 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. ठेवीदार यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शरणागती पत्कारल्यानंतर पोलिसांनी त्यांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती त्यानंतर ते जेलमध्ये आहेत. बँक घोटाळ्यातील इतर संचालक फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास असुन पोलीस निरीक्षण संतोष शेजाळ तपास करीत आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे 28 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.तपासात वसंतदादा बँकेने अनेक चुकीच्या बाबी करीत अपहार केल्याचे समोर आले आहे.
वसंतदादा बँकेत ओव्हर ड्राफ्ट, स्वयं रोजगार कर्ज असे बोगस कर्जवाटप करुन करोडो रुपयांची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर घेतली व नंतर ती जयलक्ष्मी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्यात दंडनाईक यांची मुले, पत्नी असा परिवार आहे. सुरेखा दंडनाईक यांच्या बचत गटाला नियमबाह्य कर्ज दिले असा ठपका आहे.
वसंतदादा बँकेतून संशयित स्वयंरोजगार कर्ज, बचत गटाला कर्ज व ओव्हर ड्राफ्ट देताना संचालक मंडळाने कोणतीही कागदपत्रे न घेता मंजुरीचा ठराव घेऊन तात्काळ मान्यता दिली, कर्जवसुल होणार नसल्याचे ज्ञात असतानाही ते वाटप केले आणि जाणीवपूर्वक वसुलीसाठी पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित होतो असे निरीक्षण नोंदविले.
वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपी
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे आरोपी आहेत.