ठेवीदार यांच्या हक्कासाठी दैनिक समय सारथीचा पाठपुरावा
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य सूत्रधार आरोपी विजय नाना दंडनाईक यांनी अखेर शरणागती पत्कारल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. धाराशिव येथील कोर्टाने त्यांना 25 जानेवारी गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शोधमोहीम व धाडसत्र सुरु केल्यावर दंडनाईक हे स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले आहेत, त्यांनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन अटक करण्यात आली व कोर्टासमोर हजर करण्यात आले. गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 6 महिने ते फरार होते त्यांचा जामीन जिल्हा व संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यात जवळपास 18 आरोपी पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते, या घोटाळ्यातील ही पहिली अटक आहे. पोलिसांनी 4 दिवसापुर्वी दंडनाईक यांचे घर, कार्यालयात धाडी टाकत शोध घेतला तसेच इतर आरोपीचा ही ठावठिकाणा शोधला मात्र ते सापडले नाहीत त्यानंतर मुसक्या आवळल्यानंतर ते पोलिसांसमोर हजर झाले व त्यांना अटक करण्यात आली.
दंडनाईक व इतर काही संचालक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज धाराशिव येथील न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र कोर्टाने जामीन नाकारणार असल्याचे सांगताच त्यांनी अर्ज मागे घेतला तर काहींचा जामीन फेटाळला. वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे तपास करीत आहे. या घोटाळ्यात दंडनाईक यांचा संचालक मुलगा पृथ्वीराज,पत्नी सुरेखा असे कुटुंब अडकले आहेत. या घोटाळ्यातील इतर संचालक आरोपी फरार असुन पोलिस त्यांच्या कायम मागावर आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे 28 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.
वसंतदादा बँकेत ओव्हर ड्राफ्ट, स्वयं रोजगार कर्ज असे बोगस कर्जवाटप करुन करोडो रुपयांची रक्कम चेअरमन विजय दंडनाईक यांनी त्याच दिवशी त्यांच्या खात्यावर घेतली व नंतर ती जयलक्ष्मी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. त्या कारखान्यात दंडनाईक यांची मुले, पत्नी असा परिवार आहे. सुरेखा दंडनाईक यांच्या बचत गटाला नियमबाह्य कर्ज दिले असा ठपका आहे.
वसंतदादा बँकेतून संशयित स्वयंरोजगार कर्ज, बचत गटाला कर्ज व ओव्हर ड्राफ्ट देताना संचालक मंडळाने कोणतीही कागदपत्रे न घेता मंजुरीचा ठराव घेऊन तात्काळ मान्यता दिली, कर्जवसुल होणार नसल्याचे ज्ञात असतानाही ते वाटप केले आणि जाणीवपूर्वक वसुलीसाठी पावले उचलली नाहीत त्यामुळे त्यांचा या घोटाळ्यातील सहभाग अधोरेखित होतो असे निरीक्षण नोंदविले.
वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपी
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे आरोपी आहेत.