धाराशिव – समय सारथी
तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करीचा विषय आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारात मांडला जाणार आहे. तुळजापूर शहरात सुरु असलेले ड्रग्ज तस्करीचे रॅकेट मोडीत काढुन आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तुळजापूर शहरातील पुजारी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहे. तस्करावर कारवाई न झाल्यास तुळजापूर शहर बंद व आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तुळजापूर येथील नागनाथ भाऊ भांजी यांनी याबाबत माहिती दिली. तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर तीर्थक्षेत्री गेल्या काही वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी ड्रग्ज प्रकरणात लक्ष घातल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उघड झाले. तुळजापुरात विक्रीसाठी येणारे अडीच लाख रुपयांचे 59 पुड्या एमडी ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना अटक केली असुन तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग व मुंबई येथील तस्कर संगीता गोळे यांना यात आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक 3 आरोपीना 9 दिवसांची 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.