धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजारी व ड्रग्ज असा संबंध जोडून पुजाऱ्यांना बदनाम केले जात असुन सर्व पुजारी यांना यात घेऊन ड्रग्जच्या मुळ मुद्या व तपासापासुन विषयांतर केले जात असल्याचा आरोप तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे परमेश्वर कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे, पुजारी धीरज पाटील, सामाजिक कार्यकर्ते नागनाथ भाऊ भांजी यांनी केला आहे. ड्रग्ज तस्करीत 21 आरोपी फरार आहेत त्यावर कोणीही बोलत नाही, आरोपी पळवून लावण्यात हातभार कोणाचा असा सवाल करीत अमरराजे कदम यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहेत. विषयांतर न करता फरार आरोपी व सुत्रधार कोण यावर तपास केंद्रीत करावा आणि आरोपीवर मकोका लावावा अशी मागणी धीरज पाटील यांनी केली. पुजाऱ्यानी हे प्रकरण बाहेर काढले, आंदोलन केले आणि आता त्यांना बदनाम केले जात आहे असे सांगत विपीन शिंदे यांनी निषेध केला तर सर्व पुजाऱ्याना यात घेऊन मुळ विषय बाजूला करण्याचे हे जाणीवपूर्वक रचलेले धूर्त षडयंत्र आहे, कोणाचेही नाव आले तरी सोडू नका अशी भुमिका नागनाथ भाऊ भांजी यांनी मांडली.
गेल्या 3 वर्षांपासुन तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करी सुरु होती, त्यावेळी कारवाई केली नाही मात्र आता पुजारी व ड्रग्ज असे जोडून बदनामी केली जाते. ज्यांची नावे आरोपी म्हणुन आली आहेत ते मंदिरात येऊन ताट घेऊन पुजा करीत नाहीत, त्यांचे व्यवसाय वेगळे आहेत मात्र पुजारी म्हणुन बदनामी केली जाते. पोलिसांनी 21 फरार आरोपीना पकडावे. पोलिसांनी 80 जणांना नोटीसा दिल्या आहेत त्यावर काय केले? पोलीस कोणाची वाट पाहत आहेत. आरोपी पळवुन लावण्यात हातभार कोणाचा? चोर सोडून सन्याशाला फाशी असा हा प्रकार असुन गुन्हेगाराला जात पात नसते त्यामुळे कारवाई करा पण पुजारी बदनाम करू नका, अन्यथा आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळाचे अध्यक्ष कदम यांनी दिला आहे.
तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्स प्रकरणात आजही 21 आरोपी फरार असून, या प्रकरणात तपास यंत्रणांनी अद्याप ठोस कारवाई केलेली नाही,याची कुठेही चर्चा नाही. विशेष म्हणजे, या आरोपींपैकी काहींना ‘पुजारी’ असल्याचे दाखवून संपूर्ण पुजारी वर्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप धीरज पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. पुजारी व आरोपी यांचा संबंध जोडून संभ्रम निर्माण केला जात आहे. विषयांतर न करता तपास फक्त फरार आरोपी व मुख्य सूत्रधारांवर केंद्रित असावा. ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जावी. तुळजापूर शहरात सुमारे चार ते पाच हजार पुजारी वर्ग आहे मात्र या प्रकरणात केवळ चार आरोपींची नावे पुजारी असल्याचे सांगण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण पुजारी वर्गावर संशय घेणे हे अन्यायकारक आहे असे पाटील म्हणाले. तपासामध्ये कुठेही आरोपी पुजारी आहेत, असा अधिकृत उल्लेख नाही. तरीदेखील माध्यमांतून पुजारी हेच आरोपी असल्याचे चित्र रंगवले जात आहे. ही एकप्रकारे तुळजापूर मंदिर संस्थान आणि परिसराला बदनाम करण्याची खेळी आहे एक षडयंत्र आहे असा आरोप पाटील यांनी केला आहे.
पुजारी व ड्रग्ज हा विषय वेगळा आहे, विनाकारण पुजारी, तुळजाभवानी व तुळजापूरची बदनामी केली जाते. देऊळ ए कवायत हा नियम मंदिरातील रूढी परंपरा व वर्तन बाबत आहे, बाहेर कोण काय केले तर तो वयक्तिक दोषी आहे त्याचा पुजारी व तुळजाभवानी देवी याच्याशी संबंध नाही. भाविक व पुजारी यात गैरसमज निर्माण करुन संभ्रम निर्माण केला जातो आहे असे म्हणत तुळजाभवानी व पुजारी वर्गाची बदनामी थांबवा असे प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांनी म्हणटले आहे.
एकदरीत सर्व पुजारी यांना बदनाम करुन ड्रग्ज तस्करी हा मुळ गंभीर सामाजिक विषय बाजूला करण्याचा काही जणांचा डाव असल्याचे दिसते, ही कल्पना व उद्योग कोणाचा हेही आगामी काळात समोर येणे गरजेचे आहे. आरोपींची नावे निष्पन्न झाल्यावर महिनाभराच्या काळात पोलीस व मंदीर प्रशासनाने, प्रसार माध्यम व इतर कोणीही ड्रग्ज आणि पुजाऱ्याशी संबंध जोडला नाही मग अचानक ही कल्पना कोणाला व का सुचली. पुजाऱ्यावर कारवाई करा असा अठ्ठास कोणाचा आणि का हाही एक प्रश्न आहे. ड्रग्ज हा राजकीय, व्यक्तीक द्वेष काढण्याचा विषय नसुन सामाजिक चिंतेचा विषय आहे.