तुळजापूर नगरपरिषद निवडणूक : महायुतीत बिघाडीचे संकेत ; युतीधर्म पाळा अन्यथा स्वबळावर लढू – भाजपला इशारा
तुळजापूर – समय सारथी
आगामी तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मतभेद उघड झाले आहेत. नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने चुरस वाढली असायन भाजपने या पदावर दावा केला आहे, मात्र मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “भाजपाने युतीधर्म पाळला आणि मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक दिली तरच आम्ही सोबत जाऊ, अन्यथा शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे,” असा इशारा शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी दिला आहे.
तुळजापुरात पत्रकारांशी बोलताना कदम यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “महायुतीतील मोठा भाऊ म्हणून भाजपने मित्रपक्षांना सोबत घेण्याबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून जागावाटपाबद्दल कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. त्यामुळे लवकरच आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून स्वबळावर लढण्याचा किंवा अन्य पर्यायांचा विचार करू.”
‘भाजपने अनेक पर्यायांचा विचार करावा’
“मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक देऊन जागा वाटप झाले, तरच आम्ही महाविकास आघाडीविरोधात एकत्र लढू. अन्यथा शिवसेनेकडे अनेक पर्याय आहेत, याचा भाजपने गांभीर्याने विचार करावा,” असेही कदम म्हणाले. पक्षाने आदेश दिल्यास आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार
यावेळी बोलताना अमरराजे कदम यांनी निवडणुकीतील मुद्देही स्पष्ट केले. “श्रीक्षेत्र तुळजापूरचा सर्वांगीण विकास, भयमुक्त आणि ड्रग्जमुक्त शहर हे आमचे प्रमुख मुद्दे असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन अनेकजण शिवसेनेत दाखल झाले आहेत, त्यामुळे आम्ही १० ते १५ जागा निश्चितपणे लढवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कदम यांच्या या भूमिकेमुळे तुळजापूरच्या राजकारणात निवडणुकीपूर्वीच रंगत निर्माण झाली आहे.