तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या निर्देशानुसार 14 मार्च रोजी नुतन न्यायालयीन इमारत तुळजापूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. श्रीमती एस.डी.अवसेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अध्यक्षा तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर यांचे हस्ते सदर लोकअदालतीचे तुळजाभवानी मातेचे पुजन व दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अविनाश ढोके,2रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, तुळजापूर, अनुपम मुक्कनवार, 3रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, तुळजापूर, ॲड जयवंत इंगळे, अध्यक्ष विधिज्ञ मंडळ, तुळजापूर हे उपस्थित होते. तसेच विधिज्ञ मंडळ, तुळजापूर मधील विधिज्ञ व कर्मचारी, पक्षकार वर्ग उपस्थित होते.
लोकअदालतीमध्ये तुळजापूर तालुक्यातून मोठया संख्येने प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाची अशी एकुण 853 व दावा पुर्व एकुण 3270 अशी एकुण 1l4 हजार 123 प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरिता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या 58 प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये 736 अशी एकुण 794 प्रकरणामध्ये तडजोड झाली.
प्रलंबित बॅंक प्रकरणे व दावा पुर्व प्रकरणांमध्ये रुपये 22 लाख 86 हजार रक्कमेची संबंधित नगरपरिषद, बॅंक, ग्रामपंचायतींना वसुली झाली. फौजदारी स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होऊन रक्कम रुपये 14 हजार इतका दंड करणेत आला. 138 चे प्रकरणामध्ये तडजोड होऊन रुपये 9 लाख फिर्यादी पक्षाला मिळाले.
राष्ट्रीय लोकअदालत मध्ये अल्प उपहाराचे नियोजन ॲड. संजय हुनसिंगराव पवार यांनी केले. सदर लोक अदालतीस पक्षकार, विधिज्ञ, बॅंक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायीक वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, तुळजापूर विधिज्ञ संघाचे सर्व सदस्य, पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले .न्यायालयातील प्रलंबित 58 प्रकरणांमध्ये आणि वादपूर्व 736 प्रकरण असे एकूण 794 प्रकरणांमध्ये तडजोड झाली











