धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरात ड्रग्ज तस्करीची पाळेमुळे खोलवर गेली असल्याचे पोलिस तपासातून उघड होत आहे, तुळजापूर शहरात मुंबई बरोबरच शेजारील सोलापूर जिल्ह्यातुन ड्रगजची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संकेत शिंदे याला अटक केली असुन त्याने सोलापूर येथील एकाकडुन ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली आहे, त्या आरोपीचे नाव पोलिसांनी कोर्टात दिले आहे. पोलिस सोलापुरातील त्या आरोपी तस्कर व सोलापूर येथील ड्रग्ज सिंडीकेटचा तपास करीत शोध घेत आहेत. मुंबई, सोलापूर बरोबरच इतर जिल्ह्यातुन ड्रग्ज तुळजापूर व इतर ठिकाणी येत आहे. धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे सिंडीकेट असल्याचा पोलिसांचा कोर्टातील दावा यानिमित्ताने खरा ठरत आहे. तुळजापूर हे ड्रग्ज तस्करांसाठी गेट वे अर्थात प्रवेशद्वार ठरत आहे, यामुळे तुळजापुरकरानी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठेतील संकेत अनिल शिंदे हा एक मोठा तस्कर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संकेत याच्याकडुन तुळजापूर येथील सयाजी चव्हाण, ऋतुराज गाडे व सुमित शिंदे यांनी ड्रग्ज घेतल्याचे समोर आले आहे. चव्हाण व गाडे याच्याकडून पोलिसांनी 4 मार्च रोजी 10 ग्रॅम एमडी ड्रग्जच्या 17 पुड्या जप्त केल्या असुन त्यांना अटक केली आहे, कोर्टाने त्यांना 17 मार्चपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यानंतर त्याच दिवशी तुळजापुरात पोलिसांनी मोठी कारवाई करीत 4 मार्च रोजी शुक्रवार पेठेतील संकेत अनिल शिंदे याला अटक करीत त्याच्याकडुन 6 ग्राम ड्रग्ज जप्त केले. 13 पुड्या असलेल्या या ड्रग्जची किंमत 30 हजार रुपये इतकी आहे. धाराशिव येथील विशेष न्यायालयाने त्याला 18 मार्च पर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
तुळजापूर ड्रग्ज रॅकेट तपासात पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे, 63 ग्रॅम वजनाच्या त्यात 89 पुड्या ड्रग्ज होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 6 जण पोलिस कोठडीत आहेत. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड, ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे हे 4 आरोपी जेलमध्ये आहेत तर मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे हे दोघे 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे हे फरार आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका स्पष्ट करीत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची संख्या 16 वर गेली असुन मुंबई, सोलापूर अशी साखळी उघड होत आहे.