मुंबई कनेक्शनची साखळी संगीता व पिंटू मुळेपर्यंत अडकली मात्र सोलापूर येथील काही नावे निष्पन्न
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणाची व्याप्ती वाढली असुन तुळजापूर येथे मुंबई व सोलापूर या 2 शहरातुन वेगवेगळ्या मार्गाने ड्रग्ज येत असल्याचे तपासात समोर आले आहे, तस्करीचे 2 वेगवेगळे कनेक्शन उघड करणे हे पोलिसांचे यश असुन त्याचा मुळापर्यंत तपास करणे हे आव्हान देखील आहे. मुंबईतील संगीता गोळे (माहेरचे नाव संगीता दादाराव आहेर) हिला ड्रग्ज पुरवणारा डीलर व इतर नावे कागदावर आली नाहीत, तीच्या वरची चैन तूर्तास तिथेच थांबली आहे. तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळेच्या अटकेनंतर त्याच्या खालील स्थानिक साखळी तूर्तास समोर आलेली नाही. त्याने तुळजापुरात कोणाला ड्रग्ज विकले, फायनासर कोण ? स्थानिक पेडलर, नियमित सेवन करणारे समोर आले नसुन तपास सुरु आहे. संतोष खोत व पिंटू हे दोघे 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत असुन त्यात काय निष्पन्न होते हेही महत्वाचे आहे. संगीताच्या वर व पिंटूच्या खालील ड्रग्ज साखळी समोर येणे अपेक्षित आहे. 28 फेब्रुवारी नंतर गेल्या 10 दिवसात मुंबई कनेक्शनमधील कोणाला अटक करण्यात आली नाही किंवा नवीन नावे निष्पन्न झाली नाहीत.
ड्रग्ज तस्करीचे वेगवेगळे सिंडीकेट तुळजापुरात सक्रीय असुन पहिल्या घटनेत पोलिसांनी मुंबई कनेक्शन उघड करीत 14 फेब्रुवारी रोजी 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या जप्त केल्या यात पोलिसांनी सुरुवातीला 3 आरोपीना अटक केली आहे तर मुंबई कनेक्शनचा तपास करताना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यावरून 4 मार्च रोजी तुळजापुरात 2 ठिकाणावरून 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या जप्त केल्या व 4 आरोपीना अटक केली, या आरोपीनी हे ड्रग्ज सोलापूर येथून विकत घेतल्याचे कबुल केले आहे.सोलापूर कनेक्शनमधुन काही नवीन नावे समोर आली असुन लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळेला 22 मार्च ,संतोष खोतला 27 मार्च,तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 मार्चला अटक करण्यात आली. यातील अरगडे, दळवी, राठोड व संगीता हे 4 जण जेलमध्ये आहेत तर खोत व मुळे हे 13 मार्च पर्यंत पोलिस कोठडीत आहेत. स्वराज उर्फ पिंटू तेलंग व वैभव मुळे हे 2 आरोपी फरार आहेत. 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली असुन ती तपास डायरीत नमुद असुन कोर्टात दिली आहेत. सोलापूरहुन ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना ड्रग्जसह अटक करण्यात आली. यातील चव्हाण, गाडे व सुमित याला 17 मार्च तर संकेत शिंदेला 18 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे त्यातील आरोपीनी सोलापूर येथून ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे.त्या लिंकमधील काही निष्पन्न झाली असुन तपास सुरु आहे.
पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे दिवसरात्र एक करुन तपास करीत आहेत.