धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज रॅकेट तपासात पोलिसांनी आजवर 3 वेळेस ड्रग्ज जप्त केले आहे, 63 ग्रॅम वजनाच्या त्यात 89 पुड्या ड्रग्ज होते. ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना आरोपी केले असुन त्यातील 10 जणांना अटक केली आहे तर 6 आरोपी फरार आहेत. 3 आरोपी जेलमध्ये आहेत तर उर्वरित 7 जण पोलिस कोठडीत आहेत, त्यातील मुंबईतील महिला तस्कर संगीता गोळे हिची वाढीव पोलिस कोठडी आज संपत आहे. फरार 6 आरोपीमध्ये तस्कर महिलेचा पती वैभव गोळे व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग यांचा समावेश आहे तर 4 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली असुन ‘ती’ नावे तपास डायरीत नमुद करीत कोर्टात सादर केली आहेत. ड्रग्जची पाळेमुळे तुळजापुरात खोलवर रुजली असुन ‘आका’ व ‘बोका’ रडारवर असुन पोलिसांनी अजुन पडकले नाही. आजवर अटक केलेल्या 10 आरोपी पैकी अनेकांवर यापुर्वी अंमली पदार्थ व ड्रग्ज तस्करीसह खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे आहेत त्यामुळे या ड्रग्ज तस्कर टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी देखील त्या दृष्टीने कागदपत्रे व इतर हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती आहे.
अमित अरगडे याच्यावर 6 गुन्हे नोंद असुन त्यात 3 गुन्हे कलम 307 व जुगारचे आहेत. संदीप राठोडवर 307 चे 2 व इतर गंभीर गुन्हे आहेत. मुंबईतील ड्रग्ज तस्कर महिला संगीता गोळे, तिचा पती वैभव व दीर अभिनव याच्यावर अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे नोंद आहेत तर विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे. इतर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासली जात आहे. तुळजापूर तपासात ड्रग्जचे मोठे सिंडीकेट समोर आले, शिवाय गंभीर गुन्हे नोंद असणे, ड्रग्ज तस्करीतुन आर्थिक उलाढाल व फायदा आणि संघटित गुन्हेगारी या प्रकारामुळे पोलिसांनी आरोपीच्या गुन्ह्यांची ‘जंत्री’ जमा केली आहे. तपासात मुंबई, धाराशिव शेजारील जिल्ह्यातील ड्रग्ज साखळीचे धागेदोरे हाती लागले आहेत.
पोलिसांना सुरुवातीला 15 फेब्रुवारीला 59 पुड्या असलेले 45 ग्रॅम, 4 मार्चला 17 पुड्या असलेलल 10 ग्रॅम व नंतर 5 मार्चला 13 पुड्या असलेले 8 ग्रॅम असे 89 पुड्या व 63 ग्रॅम ड्रग्ज सापडले. तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपीना प्रथम ड्रग्जसह तामलवाडी येथे 15 फेब्रुवारीला रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या 3 आरोपीना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई येथील महिला तस्कर संगीता गोळे, स्वराज उर्फ पिनू तेलंग व वैभव गोळे, मुंबई येथील संतोष खोत,तुळजापूर येथे गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी करणारा मुख्य म्होरक्या सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला अटक केली. सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे यांना अटक करण्यात आली, त्यातील चव्हाण, गाडे व संकेत शिंदे याच्याकडे ड्रग्ज सापडले.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका घेत ड्रग्ज तस्करावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस अधीक्षक संजय जाधव व तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत त्यामुळे पोलिसांना अपेक्षित यश मिळत आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत, त्यांनी अनेक मुद्दे कोर्टासमोर आणले आहेत. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक जाधव यांचा अनुभव व नेटवर्क यामुळे ड्रग्ज तस्करी पहिल्यांदा रेकॉर्डवर आली असुन आरोपीची साखळी टप्याटप्याने उघड होत आहे, तस्कर गळाला लागले असुन लवकरच मोठे मासे अटक होण्याची आशा आहे.