लोकप्रतिनिधीकडुन अपेक्षा – खासदार ओमराजेंची भुमिका स्पष्ट, आरोपींच्या संपर्कात कोण ? का वाचवले ?
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगराध्यक्ष, माजी सभापती यासह राजकीय पदावर असलेले नेते, पदाधिकारी आरोपी म्हणुन निष्पन्न झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज हा विषय सामाजिक असुन भावी पिढीच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे त्यामुळे या अटक केलेल्या आरोपीच्या मागे लोकप्रतिनिधी राजकीय पाठबळ देणार की त्यांना अंतर देणार हे पाहावे लागेल. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्याकडुन नागरिकांना अपेक्षा असुन त्यांनी आरोपीबाबत जाहीर भुमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, नगराध्यक्ष पती विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, माजी सभापतीचा मुलगा विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे ही आरोपींची नावे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत जोडली जात आहेत, हे सर्वजण आमदार पाटील यांच्यासोबत सावलीसारखे असत. त्यामुळे आता यांना आरोपी केल्यानंतर पाटील यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे, त्यांचा हस्तक्षेप अनेक वेळा अधोरेखित झाला आहे. अवैध धंदे ते ड्रग्ज तस्करी असा या आरोपींचा प्रवास असुन त्याला अनेक वेळा राजकीय पाठबळ मिळाले आहे. पोलिसांच्या जंत्रीनुसार मटका, गुटखा तस्करीसह अन्य गुन्ह्यात यांचा सहभाग आहे. आमदार पाटील यांना ड्रग्ज तस्करी बाबत 2-3 वर्षांपासुन माहिती होती त्यांनी कानाडोळा केल्याने तेही तितकेच दोषी आहेत. मतांच्या व बेरजेच्या राजकारणात दुर्लक्ष केले आणि भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आणल्याचा आरोप होत आहे.

गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्ती यांना राजकीय पक्ष नसतो त्यामुळे हे राजकीय पाप कोणाचे असा प्रश्न विचारला जात आहे. ड्रग्ज तस्करीत असलेले बहुतांश आरोपी हे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित आहेत, त्यातील काही जन पुर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये होते, त्यावेळी ते अवैध धंदे करीत होते मात्र भाजपात प्रवेश केल्यावर गेल्या 2-3 वर्षात ही मंडळी ड्रग्ज तस्करीत गुंतली गेली. एक दोन जणांचे फोटो खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत असल्याचे भाजपने व्हायरल केले आहेत, यावरून वादंग पेटले आहे, माझा सख्खा भाऊ जरी यात असला तरी अटक करा असे म्हणत ओमराजे यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. आरोपींच्या संपर्कात कोण होते याचे कॉल डिटेल काढा, ड्रग्ज राजकारणाचा विषय नाही असे म्हणत लवकरच यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. ओमराजे यांचे फोटो ट्रोल करणे चांगलेच अंगलट आले आहे.
तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी कोर्टात ड्रग्ज तस्करीत सहभागी असलेल्या म्होरक्याना आरोपी केले असुन 12 वॉन्टेड आरोपींची नावे जाहीर केली आहेत. पोलिसांनी गोपनीय ठेवलेले 4 आरोपी कोर्टात जाहीर केले असुन 7 नंबरचा आरोपी इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, नळदुर्ग, 10 नंबर आरोपी म्हणुन चंद्रकांत उर्फ बापु कणे, 11 नंबर प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, 12 नंबर आरोपी म्हणुन उदय शेटे याचे नाव उघड केले आहे. या 4 गोपनीय नावासोबत नवीन 6 आरोपीत 20 नंबर आरोपी म्हणुन विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, 21 नंबरला गजानन उर्फ हांग्या प्रदीप हंगरकर, 22 ला शरद रामकृष्ण जमदडे, 23 ला आबासाहेब गणराज पवार, 24 ला अलोक शिंदे व 25 नंबर आरोपी म्हणुन अभिजीत गव्हाड याची नावे जाहीर केली आहेत. मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग हे सर्व 12 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या सर्वांचे आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल व इतर माहिती तपासात मिळाली आहे, आगामी काळात आरोपींची संख्या वाढू शकते. ड्रग्ज तस्करीत 25 जन आरोपी असुन 12 जन फरार आहेत, 10 जन जेलमध्ये तर 3 जन पोलिस कोठडीत आहेत.