धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज तस्करीतील आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे याने 25 ऑगस्ट 2024 रोजी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांचे ड्रग्ज खरेदी केले आहे. हे ड्रग्ज खरेदी करताना त्यांनी 3 ते 4 जणांच्या फोन पे वरून पैसे पाठवले आहेत.
ड्रग्ज तस्करीत पिटू गंगणे यांनी दुसऱ्याच्या नावाने खरेदी केलेले सिमकार्ड देखील वापरले आहे. गंगणे वापरत असलेला 9850110411 हा सिम नंबर सुरुवातीला माजी नगरसेवक नारायण राजे गवळी यांच्या नावावर होता मात्र गवळी हे 2018 साली मयत झाल्यावर त्यांचे मेहुणे कृष्णा दत्तात्रय काळे यांना तो नंबर पोर्ट करुन घ्यायला गंगणे यांनी सांगितला. काळे यांच्या नावावर असलेले मोबाईल सिमकार्ड गंगणे वापरत होते व त्यावरून ड्रग्ज मागवत होता. हा सगळा काळाबाजार आता उघड झाला आहे. गंगणे व मुंबईतील ड्रग्ज तस्कर यांचे थेट व्यवहार व इतर पुरावे समोर आले आहेत त्यामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई येथील ड्रग्ज तस्कर संतोष खोत याने गंगणे यांना 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता एसएमएस केला की, ह्या वाहिनीच्या (संगीता गोळे) हिच्या अकाउंटवर 1 लाख 85 हजार टाका त्यानुसार गंगणे यांनी 3 ते 4 जणांच्या फोनपे वरून सायंकाळी 6 च्या सुमारास 1 लाख 25 हजार पाठवले. उर्वरित 60 हजारचे रेकॉर्ड समोर आलेले नाही. ड्रग्ज तस्कर संतोष खोत व विनोद गंगणे यांचे संभाषण व त्यानंतर झालेला आर्थिक व्यवहाराचे पुरावे पोलिसांच्या चार्जशीटमध्ये आहेत. गंगणे यांनी फोन पे करायला लावले ते पैसे संबंधितांना रोख दिले, याबाबतचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
संतोष खोत, संगीता गोळे हे सध्या धाराशिव येथील जेलमध्ये आहेत तर पिटू गंगणे हे फरार आहेत. गंगणे यांनी केलेले कृत्य हे गुन्हेगारी स्वरूपाचा कट (cold blooded crime) आहे. एक दिवस आपण अडकू शकतो म्हणुन पर्याप्त काळजी घेऊन केलेले हा पुर्वनियोजित कट व गंभीर गुन्हा आहे. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखे हे कृत्य आहे.
विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी 25 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या नात्यातील 2 व्यक्तींना त्यांच्या फोन पे वरून मुंबई येथील ड्रग्ज तस्करा संतोष खोतच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितले व त्यांना ती रक्कम रोख दिली. एका व्यक्तीने दिलेल्या जबाबानुसार त्याला 25 ऑगस्ट रोजी 40 हजार, 45 हजार व 20 हजार असे 1 लाख 5 हजार टाकायला लावले, त्याचं दिवशी एका व्यापारी मित्राला ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर 20 हजार टाकायला लावले, असे 25 ऑगस्ट रोजी 1 लाख 25 हजार टाकायला लावले.
गंगणे हे मुंबई येथील तस्करांच्या थेट संपर्कात होते, त्याचे पुरावे आहेत. 3 ते 5 हजार रुपये प्रति ग्रॅम ड्रग्जचा दर आहे, त्याप्रमाणे गंगणे यांनी एकाच दिवशी 25 ते 40 पुड्या ड्रग्ज खरेदी केले व त्याची साठवणुक केली. (ड्रग्ज साठवणे व बाळगणे गुन्हा आहे) इतका मोठा ड्रग्ज साठा व्यसनासाठी असतो की विक्रीसाठी ? ते ड्रग्ज तुळजापूरपर्यंत कसे व कोणी आणले हा तपासाचा भाग आहे.
पिटू गंगणे यांनी इतर अनेक लोकांच्या सोबतच स्वतःचे बंधु विजय गंगणे यांचा सुद्धा वापर केला, विजय गंगणे यांच्या खात्यावरून 30 सप्टेंबर 24 रोजी 18 हजार ड्रग्ज तस्कराच्या खात्यावर टाकले, पोलिसांनी जेव्हा नोटीसा दिल्या तेव्हा ही बाब समोर आली आहे. पिटू गंगणे हे समाजसेवा करीत असल्याने वेळोवेळी ते लोकांना पैसे देत म्हणुन आपण 18 हजार टाकले असे विजय गंगणे यांच्या जबाबात नमुद आहे. पिटू गंगणे यांनी शांत डोक्याने कट रचत ड्रग्जचे सेवन केले त्यासाठी त्यांनी इतरांचा वापर केला हे गुन्हेगारी मानसिकतेचा प्रकार आहे. गंगणे यांच्या बाबतीत ज्याच्या खात्याचा वापर झाला त्यांना साक्षीदार बनवले असुन बहुतांश जबाब हे कॉपी पेस्ट म्हणजे एक सारखेच वाक्यरचनेचे आहेत.
ड्रग्ज तस्कर गटातील जवळपास सगळ्यांचे पुरावे सारखे आहेत. फोन पे, कॉल व एसएमएस डिटेल याचा समावेश आहे, मात्र केवळ पोलिसांना टीप दिली म्हणुन त्यांचा समावेश व्यसनी गटात केल्याचा आरोप इतर आरोपीचे नातेवाईक करीत आहेत. सगळे एकत्र करीत होते मग हा दुजाभाव का? असे ते म्हणत आहेत. पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करीत कागदपत्रे जमा केली आहेत, मात्र 2 गट करीत गंगणे यांना व्यसनी गटात आरोपी केले आहे. तुळजापूर पोलिसांनी तब्बल 10 हजार 744 पानाचे दोषारोप/चार्जशीट दाखल केले असुन त्यात त्यांनी 36 पैकी 26 आरोपीना ड्रग्ज तस्कर तर 10 आरोपीना व्यसनी असल्याचा ठपका ठेवला आहे. त्या चार्जशीटनुसार एकामागुन एक असे अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.