आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विजय गंगणे यांसह इतरांना आरोपी करा, माने यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणात राजाभाऊ माने यांनी धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एक अर्ज केला होता, माने यांना कोर्टाने फटकारले असुन अर्ज दाखल करुन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. माने यांचा ड्रग्ज गुन्ह्याशी व गुन्ह्यातील सुनावणीशी वैयक्तिक संबंध काय ? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. locus standi (दावा दाखल करण्याचा अधिकार) हा कायदेशीर मुद्दा कोर्टाने उपस्थितीत करीत ह्यानुसार माने यांना अधिकार नाही असे म्हणटले आहे, यामुळे संबंधीतांना दिलासा मिळाला आहे. यात माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याने मी पिडीत आहे,पाठपुरावा करुन योग्य ठिकाणी कायदेशीर लढा देऊन दाद मागणार असल्याचे माने म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात 18 आरोपी अटक असुन नियमित सुनावणी 3 जुनला होणार आहे.
तुळजापुर ड्रग्ज प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विजय गंगणे, विशाल छत्रे, सुरज साठे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख,तपास अधिकारी गोकुळ ठाकुर, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना आरोपी म्हणुन समाविष्ट करा असा अर्ज राजाभाऊ माने यांनी कोर्टात दाखल केला होता, भारतीय न्याय सुरक्षा संहिता कलम 358 अन्वये आरोपी करा असे म्हणत माने यांनी अर्ज केला होता. राजाभाऊ माने हे या प्रकरणात तक्रारदार, आरोपी किंवा सरकारी पक्ष नाहीत त्यामुळे त्यांना या प्रकरणात कोर्टात प्रकरण दाखल करण्याचा अधिकार नाही असे म्हणत अर्ज दाखल करण्यास व त्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे, कोर्टाने अर्जाची नोंद घेत त्याला आर्टिकल नंबर दिला आहे, अर्ज स्वीकारलाही नाही व फेटाळलाही नाही त्यामुळे मी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असे माने म्हणाले.
अर्जातील आरोप व मुद्दे –
ड्रग्ज तस्करी प्रकरणात फरार आरोपी विनोद पिटू गंगणे यांचे बंधु विजय गंगणे यांच्या पत्रकार परिषदेतील दाव्यानुसार आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना गंगणे यांच्या ड्रग्ज व्यसनाबद्दल व तुळजापुरातील ड्रग्ज उपलब्धतेबाबत माहिती होती. त्यांनी तेरणा हॉस्पिटल नेरुळ येथे पाठवले व त्यानंतर गंगणे यांच्यावर बडोदा येथे उपचार करण्यात आले, अशी माहिती विजय गंगणे यांनी दिली. आमदार पाटील यांना ड्रग्जच्या गंभीर दखलपात्र गुन्ह्याबद्दल माहिती मिळुनही लोकप्रतिनिधी म्हणुन ती तात्काळ पोलिसांना देणे कर्तव्य होते. लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यांनी ही माहिती लपवुन ठेवली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अडचण व मतांवर परिणाम होऊ नये म्हणुन गंगणे याला वाचवण्यासाठी प्रकरण दडपून ठेवले. परिणामी या काळात ड्रग्ज तस्करी सुरु राहिली व तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकली, याला ते सुद्धा जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना सहआरोपी करा असा माने यांचा अर्ज होता. आमदार पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद व जाहीर भाषणातुन ड्रग्ज, कारवाई व इतर बाबीचा उलघडा केला आहे, असे अर्जात नमुद केले आहे.
राजाभाऊ माने का गेले कोर्टात –
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजाभाऊ माने यांनी एक तक्रारी अर्ज केला होता त्याच्या व गुन्ह्याच्या अनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी माने यांना पोलिसांनी लेखी नोटीस काढली होती. त्यानंतर पोलिसांना लेखी जबाब दिल्याचा माने यांचा दावा असुन त्याचबाबतचे काही पुरावे जोडले आहेत तर दुसरीकडे माने यांनी पोलिसांना जबाब दिला नाही, खोटी कागदपत्रे तयार करुन संबंध नसताना आरोप करीत बदनामी केली अशी फिर्यादी विशाल छत्रे यांनी दिल्याने माने यांच्या विरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जबाब प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, त्यातून हे प्रकरण कोर्टात गेले आहे.
Locus standi याचा अर्थ –
Locus standi हा लॅटिन शब्द असुन न्यायालयीन प्रक्रियेतील एक महत्वाची मुलभूत संकल्पना आहे. कायद्याच्या परिभाषेत त्याला मोठे महत्व असुन व्यापक दृष्टीकोन व काही मर्यादा सुद्धा घालुन दिल्या आहेत. एखाद्या व्यक्तीस न्यायालयात प्रकरण/अर्ज / याचिका दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे की नाही, हे ठरवण्याचे निकष. एखाद्या व्यक्तीला न्यायालयात अर्ज करण्यासाठी तो विषय त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा कायदेशीर संबंधात आहे का? हे तपासले जाते.