धाराशिव – समय सारथी
माळुब्रा येथील सरपंच सुरेखा सुतार यांना तुळजापूर येथील कोर्टाने मोठा दिलासा दिला असुन ऍड इंगळे यांचा यशस्वी युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरला आहे. सुतार यांचे नामनिर्देशपत्र बेकायदेशीररित्या स्वीकारले असा आक्षेप घेत नाना घाटे यांनी तुळजापुर येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक लढवित असताना प्रत्येक उमेदवाराने त्याचे नामनिर्देशन पत्रासोबत परिशिष्ट दोन मधील नमून्यामध्ये शपथपत्र घोषणापत्र देणे बंधनकारक होते. शपथपत्र व घोषणपत्रा मध्ये प्रत्येक रकान्यामध्ये संपूर्ण माहिती नमूद करणे आवश्यक व बंधनकारक होते. त्यात उमदेवाराने त्यांची असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच स्थावर व जंगम मालमत्तेच्या बाबतीचा स्वताचा तपशील तसेच पत्नी व अवलंबीताचा तपशील देणे बंधनकारक होते. उमेदवाराचे शिक्षण त्यास असलेले शासकीय निमशासकीय देणे तसेच इतर देणे सदर घोषणापत्रामध्ये नमुद करणे बंधनकारक होते.
सुतार यांनी त्यांच्या जंगम मालमत्तेच्या तपशील या रकान्यामध्ये पतीचे नाव नमूद केलेले नाही. तसेच अवलंबित रकान्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत. तसेच सदर रकान्याच्या कॉलम 7 मध्ये स्वतःच्या नावापुढे देखील रेष मारलेली आहे. स्थावर मालमत्तेच्या तपशीलाच्या सर्वच रकान्यामध्ये जवळपास रेषा मारलेल्या आहेत. तसेच शासकीय निमशासकीय देणीच्या रकान्यामध्ये त्यांनी रेषही मारलेली नाही सर्व रकाने रिकामे सोडलेले आहेत. तसेच सदर घोषणापत्राची तडताळणी झाल्यानंतर त्यावरती स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून सदरची नामनिर्देशनपत्रामधील तसेच सदर घोषणापत्रामधील वर नमूद बाबी या महत्वाच्या स्वरूपाचा दोष आहे. म्हणून ते नामंजूर करावे अशी याचिका दाखल केली.
नामनिर्देशनपत्रासोबत शौचालयाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. ज्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, ते स्वतःच्या घरात राहतात. परंतू सदर घोषणापत्रामध्ये त्यांनी सदर घराचा उल्लेख केलेला नाही. सदर बाब देखील सदर घोषणापत्राचा महत्वाचा दोष आहे. जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र न जोडल्यामुळे सदरचे, नामनिर्देशनपत्र नामंजूर करावे, निवडणूक अधिकारी यांनी अर्जात अनेक त्रुटी असताना ते स्वीकारले असा आरोप केला होता.
ऍड जयवंत इंगळे यांनी सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून निर्णय दिला आहे. नाना घाटे यांनी केलेली तक्रार व याचिका फेटाळून लावली. निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांचा व कागदपत्र आधारे निर्णय दिला. सरपंच सुरेखा सुतार यांच्यातर्फे ऍड जयवंत इंगळे यांनी काम पाहिले. त्यांना ऍड आकाश नेपते, ऍड अजिंक्य हंगरागेकर समाधान देवकर व ऍड रविकिरण जाधव यांनी सहकार्य केले.











