धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील 6 हजार 95 बोगस मतदार नोंदणी अर्ज प्रकरणी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी रोखठोक स्पष्ट भुमिका केली असुन या प्रकरणात संबंधित विभाग चौकशी करीत असुन चौकशी व्हावी यात काही दुमत नाही. हा विषय योग्य पद्धतीने हाताळला गेला पाहीजे असे सांगत त्यांनी ‘पाठपुरावा’ करणार असल्याचे संकेत दिले. आरोप प्रत्यारोपाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा त्यावर ‘तोडगा’ रुपी औषध शोधण्यात आमदार पाटील यांचा ‘हातखंडा’ आहे.
आमदार यांच्या कडक भूमिकेनंतर यात ‘ठोस’ कारवाई होईल अशी ‘आशा’ सामान्य जनतेत पल्लवीत झाली आहे. पीकविमा, ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अभ्यासपुर्ण ‘लक्ष’ दिल्याने ते विषय मार्गी लागले त्याच प्रमाणे ‘बोगस’ मतदार नोंदणी अर्ज प्रकरण ‘तडीस’ लागेल असा एक ‘आगळावेगळा’ विश्वास निर्माण झाला आहे. तपास यंत्रणा सुद्धा त्यांचा ‘इशारा’ तितकाच गांभीर्याने घेतीलच.
बोगस मतदार नोंदणी बाबत जे आरोप करण्यात आले आहेत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे आणि त्याबाबत चौकशी सुरु आहे असे वाटते असे आमदार पाटील म्हणाले. त्यांच्याकडे दुसरे काही बोलण्यासारखे काही नाही असा टोला त्यांनी खासदर ओमराजे निंबाळकर यांना लागवला. निवडणुक आयोगाचे मत आहे की चुकीचे काही झाले नाही, एकही चुकीचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही असे आयोग देशभर सांगतो त्याला या प्रक्रियेतुन पुष्टी मिळते. इतर काही गोष्टी तुळजापूरला झाल्या असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे यात कोणतीही शंका नाही.
तुळजापूरमध्ये जे बोगस मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले त्यात काही जन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तेरणा कॉलेजचे विद्यार्थी होते असा गंभीर आरोप शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत करीत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय व राज्य निवडणुक आयोगाकडे केली होते. त्यावर बोलताना राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, आरोप कोणीही काहीही करू शकते, त्याला अर्थ नाही. चौकशी होणे गरजेचे आहे.संबंधित विभाग याची चौकशी करेल, चौकशी करणार नाही असे होणार नाही.हा विषय योग्य पद्धतीने हाताळला जावा याबाबत कोणाचे दुमत नाही अशी रोखठोक भुमिका आमदार पाटील यांनी स्पष्ट केली.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात 2 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या काळात ‘व्होटर हेल्पलाईन’ या अँपच्या माध्यमातुन बोगस आधार कार्ड,नंबर व कागदपत्रे वापरून तब्बल 6 हजार 95 मतदार नोंदणी अर्ज करण्यात आले,चावडी वाचनमध्ये 294 मतदान केंद्रावर बोगस अर्ज नोंदणी करण्यात आली. वेळीच तोतयेगिरी लक्षात आल्यानंतर निवडणुक विभागाने हे अर्ज नामंजूर करीत पोलिसात निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 172,3(5),318(2),335,336(2),336(3),340(2)61(2) व 62 अन्वये गुन्हा नोंद केला.
या गुन्ह्याचा तपास गेली 10 महिन्यात लागला नाही. तपास न झाल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही गंभीर आरोप करीत प्रश्न उपस्थितीत केले आहे. ओमराजे यांनी केंद्रीय व राज्य निवडणुक आयोगाकडे याबाबत तक्रार केली त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी राज्य निवडणुक आयोगाला लेखी अहवाल पाठवला असुन त्यात पोलिस तपास करीत असल्याचे म्हणत पोलिसांकडे बोट दाखवले आहे.