धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरातील कुलदीप मगर जीवघेणा हल्ला प्रकरणी भाजप व विनोद पिटू भाई गंगणे मित्र परिवाराने शांततेत मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिले आहे. निर्दोषांना गोवू नका, दोषींना शिक्षा द्या असे म्हणत त्यांनी हल्याच्या घटनेचा निषेध केला. मगर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप करत भाजपने म्हटले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांचे राजकीय विरोधक या घटनेत विनाकारण नाव गोवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासून वस्तुनिष्ठ सत्य समोर आणावे व निर्दोष व्यक्तींची नावे गुन्ह्यात घेऊ नयेत.कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, संतोष परमेश्वर, संदीप गंगणे, माउली भोसले, विशाल रोचकरी, लखन पेंदे, किशोर साठे, औदुंबर कदम यांच्यासह शेकडो महिला, नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.











