धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील कुलदीप मगर यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात मगर यांनी पोलिसांना पुरवणी जबाब दिला असुन त्यात विनोद पिटू भाई गंगणे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या हल्लाचे सुत्रधार गंगणे असुन त्यांनी जीवघेण्या हल्ल्याचा कट रचला, शस्त्र पुरवली असा आरोप मगर यांनी पुरवणी जबाबात केला आहे. मगर यांच्या जबाबानंतर पोलिस गंगणे यांना आरोपी करणार का ? हे पाहावे लागेल.
मगर यांच्या जबाबानुसार, मी सोलापूर येथे आयसीयु उपचार घेत असुन मी पुर्वी पोलिसांना जबाब दिला होता मात्र त्यावेळी मला काही गोष्टी आठवत नव्हत्या. आज मी पुर्णपणे शुद्धीवर आहे. मला जीवे मारण्याचा कट विनोद पिटू गंगणे यांनी रचला, मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचे काम केले होते. मी पुर्वी विनोद गंगणे यांच्यासोबत काम करीत होतो मात्र त्यांच्यावर ड्रग्जचे आरोप झाल्याने मी गंगणे यांच्या सोबत काम करणे बंद केले. मी माझ्या भावासाठी काम केल्याने मला मारण्याचा कट रचण्यात आला व जीवघेणा हल्ला केला. विनोद गंगणे यांनी कट रचला व त्यांच्या सांगण्यावरून जीवघेणा हल्ला करण्यात आला, यासाठी धारदार शस्त्र, बंदूका पुरवठा करून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्यास प्रवृत्त केले. सर्व घटनेला गंगणे जबाबदार असुन मुख्य सूत्रधार गंगणे हेच आहेत.
निर्दोषांना गोवू नका, दोषींना शिक्षा द्या असे म्हणत भाजप व विनोद पिटू भाई गंगणे मित्र परिवाराने शांततेत मोर्चा काढत तुळजापूर पोलिसांना निवेदन दिले आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगत दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे, घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासून वस्तुनिष्ठ सत्य समोर आणावे व निर्दोष व्यक्तींची नावे गुन्ह्यात घेऊ नयेत. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही केली आहे.











