तुळजापुरात अवैध शस्त्र, बंदूकबाजी – मगर यांच्या डोक्यात 35 टाके, आंदोलनाचा इशारा, पत्रकार परिषद
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असुन त्यांच्या डोक्यात 35 टाके पडले आहेत. दिवसाढवळ्या कोयते, बंदुका घेऊन झालेला हा हल्ला सत्तेच्या माज व पैशाच्या मस्तीतुन झाला असुन विनोद गंगणे यांच्यासह त्यांच्या टोळीला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा वरदहस्त आहे. नियोजित झालेल्या या हल्ल्याचा मास्टर माईंड शोधा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तुळजापूर येथे अनेक जणाकडे अवैध शस्त्र असुन बंदूकबाजीचा प्रकार घडला आहे. या पत्रकार परिषदेला माधवराव कुतवळ, नागनाथ भाऊ भांजी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, अमर मगर, सुधीर कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
नळदुर्ग तुळजापूर या रस्त्याचे काम गेल्या वर्षी मिळाले ते काम सुरु असताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे खासगी स्वीय सहाय्यक जयेश कदम, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे व इतर स्थानिक कार्यकर्ते या कामावर आले, प्रोजेक्ट मॅनेजर यांना शिवीगाळ केली. या लोकांचा काही संबंध नाही, आम्हाला छेडण्यासाठी नातेवाईक यांच्या कंपनीला टार्गेट केले. काम निकृष्ट की चांगले हे लोकांना माहिती आहे, 5 वर्ष दुरुस्तीचे काम त्याच्याकडे आहे. आम्ही विनंती केली व भांडण सोडवले. सगळे गेले त्यानंतर फोन आला की काही जण हातात कोयते,बंदूका घेऊन गाडीवर घराकडे जात आहेत. त्याच्याकडे 5 कोयते, 2 बंदूका होत्या. त्यांनी दहशत निर्माण केली असा आरोप अमर मगर यांनी केला.
वैचारिक हेवेदावे होते मात्र असे कधी झाले नाही. कुलदीप मगर यांच्यावर हल्ला केला, 2 गोळ्या झाडल्या. तुळजाभवानी शक्तीपीठ येथे असा प्रकार घडला नव्हता मात्र आमदार पाटील यांच्या समर्थनामुळे हे घडले, त्यांनी त्यांना जवळ करू नये. 2-3 महिन्यापासून तुळजापूरची बदनामी सुरु आहे, बदनामी कोणामुळे होते हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांचेच कार्यकर्ते गोंधळ हाणामारी करतात. आमचं राजकीय वारसा मोठा आहे, आमच्यावर एकही गुन्हा नोंद नाही, त्यांना दहशत निर्माण करायची असुन त्याला न घाबरता ठामपणे उभे राहू असे मगर म्हणाले. कुलदीप मगर यांच्यावर 2 ठिकाणी डोक्यावर वार करण्यात आले असुन 35 ते 40 टाके पडले आहेत. पराभव स्पष्ट दिसत असल्याने कुरापत काढून षडयंत्र रचून हा हल्ला करण्यात आला असा आरोप मगर यांनी केला. तुळजापूरमध्ये अश्या किती तरी गावठी पिस्टेल असुन त्याचा तपास करावा असे मगर म्हणाले.
तुळजापूर शहराला काळिमा फासणारी घटना घडली असुन किरकोळ वादातुन कोयते, बंदूका घेऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला.तुळजापूर शहाराची प्रतिमा मलीन करण्याचे काम नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी केले. घरापर्यंत येऊन हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. सत्तेचा माज, पैशाची मस्ती आणि त्यांना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा वरदहस्त आहे. ड्रग्जमधील आरोपी असतानाही भाजपने गंगणे यांना उमेदवारी दिली. काल ज्यांनी हल्ला केला त्यातील काही त्यात सहभागी होते. मोबाईल सीडीआर तपासून मास्टरमाईंड समोर येऊन कारवाई होणे गरजेचे आहे असे धिरज पाटील म्हणाले.
पोलिस व काही जणांशी संगणमत करून गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही महाविकास आघाडी म्हणुन रस्त्यावर उतरू व आंदोलन करू. भाजपवाले तुळजापूरची बदनामी करीत असुन या घटनेला जबाबदार कोण याचे उत्तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी देणे गरजेचे आहे. या गुंडाना कोण पोसत असुन मॅनेज करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटले हे समोर येणे गरजेचे आहे. यापुढे जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला. 2 राउंड हवेत फायर केले असुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. कुलदीप मगर जखमी असतानाही त्यांनी 2 जणांना पकडून ठेवले.
पोलिस निरीक्षक हे कोणाला तरी घटनेची सर्व माहिती फोनवर देत होते, तुळजापूर येथे कायद्याचा कोणाला धाक राहिला नाही, पोलिसांचा वचक राहिलेला नाही, न्याय मिळेल हे दुरापास्त झाले आहे असे नागनाथ भाऊ भांजी म्हणाले. मुंबई येथील भाविकांना तुळजापूर पोलिस ठाण्याचा वाईट अनुभव आला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय घेऊ असे ते म्हणाले.
तुळजापूर येथे यापुर्वी असे हाणामारीचे प्रकार घडले नाहीत. भाजप कार्यकर्ते यांच्याकडुन जीवघेणे हत्यार, कोयते, बंदूका घेऊन गोंधळ घालण्यात आला व महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांच्या घरावर दहशत पसरविण्यासाठी नियोजन बद्ध हल्ला करण्यात आला. सायंकाळी शहरातील लोहिया गोलाई चौकसह विविध भागात 2 तास गोंधळ सुरु असताना पोलिस आले नाहीत, ते अनभिज्ञ होते की त्यांनी पोलिसांशी संधान साधुन हा हल्ला केला का ? असा सवाल कुतवळ यांनी केला. उपविभागीय पोलिस अधिकारी हे भाजपच्या बाजूने वागतात, 24 तास होत आले तरी मुख्य आरोपी अजून पकडला नाही असे कुतवळ म्हणाले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कर्तव्य आहे मात्र ते गप्प आहेत, त्यांचा या दहशतीला पाठिंबा होता का असा प्रश्न उपस्थितीत होतो, ते अजूनही घटनास्थळी आले नाहीत. आम्ही शांततावादी विचाराचे आहोत, प्रतिकार आम्हाला सुध्दा करता येतो मात्र आम्ही शांत आहोत, सहनशीलतेला मर्यादा असतात, असे पुन्हा घडले तर प्रतीउत्तर देऊ. लोकांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार कोण? हे आमदार पाटील यांनी सांगावे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे याकडे पाहावे. बंदूक व कोयता अजूनही जप्त करण्यात आला नाही, गुन्हेगार यांना जेलमध्ये टाकावे तरच वातावरण शांत होईल असे माधवराव कुतवळ म्हणाले.












