तुळजापूर – समय सारथी, नंदकिशोर नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव 6 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या काळात होणार असुन यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेत नियोजन करण्याचे आदेश दिले.
मंदिरात जाण्यासाठी घाटशीळ पार्किंग मैदान येथील सभामंडप येथून भाविकांना सोडण्यात येणार असुन बाहेर पडण्यासाठी मातंगी देवी मंदीर व जिजाऊ महाद्वार वापरण्यात येणार आहे तर व्ही आय पी व दिव्यांग व्यक्तींना राजे शहाजी महाद्वार आणि आपत्कालीन मार्ग म्हणून छत्रपती शिवाजी महाद्वार वापरण्यात येणार आहे. नवरात्र काळात बोगस पुजारी यांचा उपद्रव होऊन भाविकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी पुजारी यांची यादी तिन्ही पुजारी मंडळाकडुन मागविण्यात आली आहे. बोगस वेबसाईट व इतर प्रकारावर लक्ष असणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा व मंदीर पौर्णिमा निमित्त 27,28 व 29 ऑक्टोबर हे 3 दिवस सोलापूर रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे तर शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी स्वतंत्र टीम काम करणार आहे.डॉ आंबेडकर पुतळा ते कमान वेस या भागात हंगामी व्यापारी हॉर्क्स झोन तयार करण्यात येणार आहे.
यात्रा काळात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन ड्रोन कॅमेराने करडी नजर असणार आहे. मंदिर व परिसरात सोलेले नारळ व तेल विक्रीसाठी बंदी असणार आहे. प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी असेल शिवाय मानाच्या काठ्यांना विद्युत रोषणाई ऐवजी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
आढावा बैठकीला स्थानिक पुजारी, व्यापारी, पोलिस उपअधीक्षक डॉ निलेश देशमुख, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त डॉ योगेश खरमाटे, तहसीलदार अरविंद बोळंगे, संतोष पाटील, पोलिस निरीक्षण गजानन घाडगे यांच्यासह महसूल, पोलिस, महावितरण,एस महामंडळ विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
तुळजापूर शहरासह मंदिराचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासह पथदिवे उपाययोजना करणे, मंदिराकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर 21 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करणे, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा व डॉक्टर, अधिकारी 24 तास उपलब्ध ठेवणे, तुळजापूर शहरात गरजेच्या ठिकाणी सीसीटीव्ही व बॅरीगेटींग बसविणे, कचरा उचलून नाले साफसफाई, भाविकांसाठी पाणपोई, विविध सुचनाचे दिशादर्शक व माहिती देणारे फलक बसविणे, यात्रेपुर्वी सुरु असलेली बांधकामे थांबविण्यात येणार असुन वाहनतळ याचे शहराच्या परिसरात नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीनंतर अधिकारी यांनी प्रस्तावित वाहनतळ येथे भेट दिली.
महिला भाविकांची छेडछाड होऊ नये यासाठी दामिनी पथक तर अवैध धंदे, चोरी, रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक कार्यरत असणार असुन नियंत्रणासाठी अतिरिक्त अपर पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असणार आहेत. तुळजापूर शहरात स्थानिक वाहने वगळता इतर वाहनाना प्रवेशबंदी असणार आहे.
प्रवाशी यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तेलंगणा यासह अन्य राज्यातून बससुविधा करण्यात आली असुन त्याची स्वतंत्र पार्किंग, द्विभाषिक माहिती, उदघोषकद्वारे माहिती दिली जाणार आहे. मे आय हेल्प यु हे मदत केंद्र 24 तास बसस्थानक व इतर भागात सुरु असेल.
भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध विभागाचे पथक हॉटेल,ढाबे, किराणा दुकानाची तपासणी करुन कारवाई करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यरत राहणार असुन भविकांना राहण्यासाठी भक्त निवास यांची सोय केली आहे.