‘हद्दी’ कायम, खुजेपणाचे ‘दर्शन’ – 3 आमदार व 2 मठांना वगळले, माजी लोकप्रतिनिधीचे योगदान ‘शुन्य’ ?
धाराशिव – समय सारथी
सर्वदूर झालेल्या टिकेनंतर धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह वाकोजी बुवा व हमरोजी बुवा या 2 मठांच्या महंतांना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बाबत सांस्कृतिक मंत्री शेलार हे 18 ऑगस्ट रोजी मुंबईत आढावा बैठक घेणार आहेत. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार बैठक आयोजित केली मात्र महायुती व महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याला निमंत्रण नव्हते.
तुळजाभवानी जीर्णोद्धारबाबत 18 ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, 4 मठाचे महंत यांना बोलावणे अपेक्षित होते मात्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ‘निवडक’ लोकांची यादी दिली त्यानुसार निमंत्रण पत्र दिले गेल्याचे समजते. तुळजाभवानी देवीचे मंदिर जरी तुळजापूर मतदार संघात येत असले तरी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे या तीर्थक्षेत्रात मोलाचे योगदान वेळोवेळी आधीरेखित झाले आहे, मात्र तुळजाभवानी बाबतीत मतदारसंघाच्या ‘हद्दी’ कायम केल्या आहेत. माजी पालकमंत्री तथा भुम परंडा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, धाराशिवचे आमदार कैलास पाटील या 3 आमदारांसह गरीबनाथ बुवा व भारतीबुवा या 2 मठाच्या महंतांना बैठकीला बोलावण्यात आले नाही.
तुळजाभवानी सर्वांची देवता असून तिच्यावर सर्वांचा तितकाच हक्क आहे, सत्ता हे कोणाचे ‘ताम्रपट’ नसते असेही बोलले जाते. विद्यमान आमदार तेही मतदार संघांचेच असा निकष बैठकीला ‘निमंत्रण’ देताना लावण्यात आलेला दिसतोय. पालकमंत्री म्हणून सरनाईक तर जिल्हा कार्यक्षेत्र म्हणून खासदार ओमराजे यांना निमंत्रण देण्यात आले. विद्यमान विधानपरिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण या 2 जणांना निमंत्रण देण्यात आले नाही. शेलार यांच्या सारख्या ज्येष्ठ व ‘जाणत्या’ मंत्र्याकडून हे अपेक्षित नव्हते.
माजी पालकमंत्री डॉ पद्मसिंह पाटील व मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे यासह अनेक कार्यक्षम आजी माजी लोकप्रतिनिधी जिल्ह्यात आहेत यांचे विकासाचे व तुळजाभवानीसाठी योगदान मोठे आहे. त्यातील चव्हाण वगळता सर्व महायुतीत आहेत, या सर्वाना बैठकीला ‘मानपानाने’ बोलवून ‘मना’चा मोठेपणा (शेवटी ठरल्याप्रमाणे हेच निर्णय घेणार) दाखवता आला असता मात्र विचाराचा व प्रवृत्तीचा ‘खुजेपणा’ इथे स्पष्ट दिसून आला आहे. याचा काय संबंध, ‘हद्द’ आहे का? असा भेद करण्यात आला.
तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र करणारा सूत्रधार शोधा, अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक घ्या अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महाविकास (आधीच्या प्रेस नोटमध्ये महायुती) आघाडीतील काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे. तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे. यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची आहे.