धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदीर परिसरातील पिंपळ पाराची उंची कमी करण्याचे सर्वानुमते ठरल्याची माहिती तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिली आहे. नवरात्र काळात दसरा दिवशी देवीची पालखीतुन मिरवणुक काढली जाते त्यावेळी ही पालखी तिथे ठेवली जाते, उंची जास्त असल्याने उंची कमी करावी व पाराची दुरुस्ती करावी अशी मागणी होती त्याप्रमाणे हे काम पुरातत्व विभागाने केले. पाराच्या दगडाचा एक थर कमी केल्याने उंची कमी झाली त्यामुळे पिंपळ झाडं उघडे पडले.
अनेक भाविकांना, स्थानिकांना वाटत होते की, काम करताना काही चुका झाल्याने उंची कमी झाली. पुरात्तव विभागाने सर्व दगडांना नंबर दिले होते मग उंची कमी झाली कशी? काम करताना काही झाले का? यासह सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण मंदीर संस्थानने दिले आहे. दगडांचा एक थरच कमी केला गेला, त्यामुळे उंची कमी झाली.
नवरात्र महोत्सव दरम्यान दसऱ्याच्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुळ अष्टभुजा मुर्ती सिमोल्लंघन खेळण्यासाठी मंदिराबाहेर येते, मुर्ती ही पालखीत ठेवुन मंदीर भोवती प्रदक्षिणा घातली जाते, या सोहळ्याला हजारो भाविक येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पाराची उंची जास्त असल्यामुळे पुजारी बांधव व भाविक भक्तांना त्रास किंवा दुखापत होऊ शकते शिवाय पालखी पारा ठेवताना अनुचित घटना घडू शकते, हे सगळे टाळण्यासाठी पाराची उंची कमी करण्यात आली आहे. उंची कमी केल्याने पिंपळाच्या झाडाचा काही भाग उघडा झाला आहे.
पाराची उंची कमी करण्याचा निर्णय 18 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या बैठकीला सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर, श्रीमती तेजस्विनी आफळे, वास्तुविशारद पुणे, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजीबुवा तसेच तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष उपस्थितांमध्ये चर्चा होऊन पिंपळपार ओट्टयाच्या उंची बाबत एक थर कमी करण्याचे सर्वानुमते ठरले होते. त्यामुळे सिमोल्लंघन पिंपळपार ओट्टयाची उंची कमी करण्यात आली आहे. सदरचे काम हे पुरातत्व विभाग यांचे मार्फत करण्यात आलेले आहे असे मंदीर संस्थानने म्हण्टले आहे.