धाराशिव – समय सारथी
आशिष शेलार हे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत की कोणा एकाच्या हातातील ‘कटपुतली’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बाबत बोलावण्यात आलेल्या आढावा बैठकीचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व खासदार ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आले आहे. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बैठकीची वेळ बदलण्यात आली असुन वाकोजी बुवा व हमरोजी बुवा या 2 मठांना निमंत्रण दिले आहे मात्र पालकमंत्री व खासदार यांना मात्र ‘कट’ मारण्यात आला.
तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार बैठक आयोजित केली आहे मात्र महायुती व महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याला निमंत्रण नव्हते. सर्वदूर टीका झाल्यावर पालकमंत्री व खासदार ओमराजे निंबाळकर यांना निमंत्रण देण्यात आले, त्या दोघांना निमंत्रण मिळाले व त्यांनी बैठकीला जाण्याची तयारीही केली मात्र ऐनवेळी 3 रे सुधारित पत्र काढले व त्यात पालकमंत्री व खासदार यांचे नाव वगळले. हा एक प्रकारे लोकप्रतिनिधी यांचा अपमान आहे. 18 ऑगस्टची बैठक सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे.
मात्र भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी ‘निवडक’ लोकांची यादी दिली त्यानुसार निमंत्रण पत्र बदलले जात असल्याचे दिसते. सुरुवातीला निमंत्रण न देणे, पुन्हा देणे व नंतर निमंत्रण रद्द करणे ही ‘कसरत’ एक प्रकारे स्वतःचे अस्तित्व ‘मूल्य’ तपासणे व संबंधितासह नागरिकांना मीच ‘चालक मालक’ आहे हे दाखवून देण्यासाठी केलेला ‘प्रयोग’ असेच म्हणावे लागेल.
तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र करणारा सूत्रधार शोधा, अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक घ्या अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती. या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महाविकास (आधीच्या प्रेस नोटमध्ये महायुती) आघाडीतील काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे. तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे. यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची आहे.