धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन घेण्याचा मोह एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला. आयएएस अधिकारी असल्याचे सांगून व्हीआयपी दर्शनासाठी तुळजाभवानी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिल मदनलाल परमेश्वरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास तो वडिलांसह मंदिराच्या व्हीआयपी गेटवर आला. मंदिर कर्मचाऱ्यांना त्याने आयएएस असल्याचे सांगून थेट दर्शनासाठी सोडण्याची मागणी केली.
मंदीर कर्मचारी यांनी जनसंपर्क कार्यालयातून पास आणण्यासाठी सांगितले. तेथे पास आणण्यास गेल्यावर त्याने युपीएसीचे ओळखपत्र दाखवले. बॅच, वर्ष, विभाग सांगून याबाबत विचारणा केल्यावर तो गोंधळला. माफी मागुन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याने मंदीर कर्मचारी यांनी पोलीसांना बोलावले.











