धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेडदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे, तुळजाभवानी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे. या काळात देवीच्या धार्मिक विधी व मुखदर्शन सुरु राहणार आहेत.
मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून तब्बल 58 कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत होणार आहे. या कालावधीत सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व मुखदर्शन यासारखे धार्मिक विधी मात्र नियमित सुरू राहतील, असे मंदिर संस्थानने स्पष्ट केले आहे. सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.