तुळजापूर – समय सारथी
श्री तुळजाभवानी तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यांतर्गत तुळजापूर येथे 108 फूट उंच शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून फायबरचे मॉडेल मागविण्यात आले आहे. 108 फूट उंचीचे भव्य ब्राँझ धातूचे शिल्प उभारण्यात येणार आहे. हे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांना श्री तुळजाभवानी देवी आशीर्वाद देत असलेल्या प्रसंगावर आधारित असणार आहे. या शिल्पाच्या मूळ आराखड्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली 2.5 ते 3 फूट उंचीच्या फायबर मॉडेल्स मागविण्यात आली आहेत.
फायबर मॉडेल तयार करण्यासाठी इच्छुक शिल्पकारांकडे शिल्पकलेतील पदवी अथवा पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय किमान 15 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असणे अपेक्षित आहे. तयार करण्यात आलेल्या फायबर मॉडेल्समधून एकूण 5 मॉडेल्सची निवड निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेल सादरकर्त्याला 1 लाख 50 हजार रुपये इतके मानधन देण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेल सादरकर्त्याला 10 लाख रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. हे मॉडेल ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांचा विचार करून तयार करणे बंधनकारक आहे.




मॉडेल तयार करण्यासाठी शिल्पकार शिल्पकलेतील पदविका पदवी अशी शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला असावा. त्याचा शिल्पकलेतील व्यवसायीक कामाचा अनुभव कमीत कमी 15 वर्ष इतका असावा. प्राप्त फायबर मॉडेलमधून 5 मॉडेलची निवड करण्यासाठी निवड समितीची बैठक कला संचालक, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे संपन्न होईल.
शिल्पकारांनी इतिहासकार तसेच पुरातत्व विभागाकडून प्राप्त झालेले संदर्भ अभ्यासून मॉडेल तयार करावे. सदर फायबर मॉडेल्स 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 25 या कालावधीत कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करावयाची आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी राखून ठेवले आहेत. या उपक्रमासंदर्भातील अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. https://dharashiv.maharashtra.gov.in