धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धारबाबत संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत तुळजापूर येथील विशाल छत्रे या मटका किंगने हजेरी लावण्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बैठकीला पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व खासदार ओमराजे यांना निमंत्रण देण्यात आले मात्र ते नंतर रद्द करण्यात आले, तुळजाभवानी देवीच्या 2 मठाना देखील निमंत्रण देण्यात नाही मात्र मटका किंग अशी ओळख असलेल्याला ‘मानपान’ देण्यात आला. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला असुन त्यात ते, जिल्हाधिकारी, छत्रेसह अन्य ‘मान्यवर’ आहेत, त्या घोळक्यात जिल्हाधिकारी ‘संबोधन’ करीत आहेत.
छत्रे याच्यावर जुगार, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न असे वेगवेगळे 20 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत. हद्दपारीसह एमपीडीए सारख्या अन्य कारवाई झाल्या आहेत, त्याची गुन्ह्यांची ‘जंत्री’ मोठी आहे. आमदार पाटील यांनी नेहमीप्रमाणे यावर प्रतिक्रिया दिली नाही. अश्या कृत्याने गुन्हेगारांचा ‘पाठीराखा’, गळ्यातील ताईत अशी ‘प्रतिमा’ सर्वसामान्यात उजळून निघत आहे. जिल्ह्यातील एकाही आजी माजी लोकप्रतिनिधीला जमलं नाही पण दादांनी ‘सांभाळून व करून दाखवलं’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
मी नाही त्यातला.. अशी स्वच्छ प्रतिमा भासवणाऱ्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे ड्रग्ज, मटकासह अन्य माफियावरील ‘प्रेम’ कमी होताना दिसत नाही. 7 ऑगस्ट रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा तुळजापूर येथे नागरी सत्कार करण्यात आला, ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपी माजी नगरसेवक विनोद उर्फ पिटू गंगणे याच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला, यावेळी मंत्री बावनकुळे यांनी गंगणे याला स्टेजवर बोलवून पाठीवर कौतुकाची थाप मारत स्तुतीसुनमे उधळली त्यानंतर राज्यभर टीका झाली. बावनकुळे यांना टिकेचे ‘धनी’ व्हावे लागले. पोलिसांनी कोर्टात सादर केलेले ‘शपथपत्र’ म्हणून वेळ मारून नेली व प्रत्यक्षात पत्रकार यांच्या हातात ‘पुरवणी जबाब’ दिले.
हे प्रकरण ताजे असतानाच गंगणे याचा ‘उजवा हात’ अशी ओळख असलेल्या विशाल छत्रे याला आमदार यांनी ‘मानाचे स्थान’ दिले. बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती देणारा मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा व्हिडिओ आमदार पाटील यांनी पोस्ट केला असुन त्यात सर्वजण दिसतात. मंत्री, आमदार व जिल्हाधिकारी यांच्या जवळ जर असे गुन्हे दाखल असलेले आरोपी नेहमी फिरत असतील तर पोलिस यंत्रणावर दबाव येऊ शकतो. ते कशी कारवाई करणार ?
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी सभापती पुत्र विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, माजी नगरसेवक विनोद गंगणेसह काही जणासोबत आमदार पाटील यांचे सत्काराचे फोटो समोर आले. आमदार यांनी संबंध नाकारले नाहीत की भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची हिंमत दाखवली. उलटपक्षी आमदार यांनी त्यांना सामाजिक स्थान देत ‘शुद्धीकरण’ करीत ‘उद्धार’ केला. भाजप सारख्या शिस्तप्रिय पक्षात आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे नवीन संस्कृती रुजवुन वाढवत आहेत आणि जुने जानकार ‘प्रेक्षक’ बनले आहेत..