धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देण्यात येणाऱ्या व्हीआयपी अतिथी पासचा वाद आता चांगलाच पेटणार असुन मंदिराच्या विश्वस्त प्रमाणे पाळीकर, भोपे व उपाध्ये यां तिन्ही पुजारी मंडळाना प्रत्येकी 50 पास द्यावेत अशी मागणी पुजारी मंडळानी केली आहे. एकीकडे विश्वस्त यांच्या अतिथी पासवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना पुजारी मंडळाने सुद्धा पासची मागणी केली आहे. विश्वस्त समितीच्या बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
तुळजाभवानी मंदीर संस्थांनच्या विश्वस्त यांना त्यांचे संबंधित व्यक्ती व व्हीआयपी यांना मोफत दर्शन द्यायवाचे असल्यास त्यांना अतिथी पास आहेत तर इतरांसाठी 500 रुपये दराचे सशुल्क पास आहेत. अतिथी पास याचा ठरलेला कोटा असला तरी कोण कोणत्या विश्वस्त यांनी कोणाची शिफारस केली, कोण दर्शन घेतले त्याची नोंद मंदीर संस्थानकडे उपलब्ध नाही अशी सूत्रांची माहिती आहे.अतिथी कोट्यावर काही जण कोट्याधीश झाले आहेत. चक्क राज्यबाहेरील व सधन गरजू भाविकांना या कोट्यातुन दर्शन घडवून दिले जात असल्याने एक प्रकारे दुरुपयोग वर्षानुवर्षे सुरु आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानने घेतलेल्या विश्वस्त मंडळाच्या ठरावानुसार अतिथी कोटा देण्यात आला आहे. मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना पुर्वी हा कोटा नव्हता मात्र 13 जुलै 23 च्या ठरावानंतर त्यांना प्रथमच 10 जणांचा कोटा दिला आहे. तुळजापूर येथील स्थानिक आमदार तथा विश्वस्त व मंदिराचे सहायक जनसंपर्क अधिकारी या दोघांना सर्वाधिक प्रत्येकी 50 दर्शनाचा कोटा आहे.
मंदीर संस्थानचे विश्वस्त असलेले उपविभागीय अधिकारी, तुळजापूर तहसीलदार, नगराध्यक्ष, मंदीर तहसीलदार, पोलिस विभाग, कोर्ट विभाग या सर्वांना प्रत्येकी 10 पास आहेत. मंदीर प्रशासन अतिथी राखीव गेस्ट असा प्रोटोकॉल म्हणून 25 पास दिले आहेत अश्या प्रकारे जुना 125 व नवीन 70 असा एकूण 195 पासचा कोटा देण्यात आला आहे. अतिथी कोटा हा विषय नाजुक असल्याने त्याला कोणी धक्का लावत नाही शिवाय कोणाला याचा लाभ द्यावा बाबत फारशी सुस्पष्टता नाही.