कोट्यावर कोट्याधीश,श्रद्धेचा बाजार, नियम बदलन्याची गरज, तुळजाभवानी दर्शनाचे लाभार्थी कोण ?
तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हीआयपी दर्शनाचा मोठा गोंधळ उडल्याने भाविकांचे मोठे हाल झाले. 500 रुपये सशुल्क दर्शन पैसे देऊनही तब्बल 2-3 तास रांगेत उभे राहून दर्शन पास मिळेना नसल्याने भाविक संतप्त झाले त्यानंतर गोंधळ पाहून मंदीर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन पास देणे बंद केले. काही पुजारी व मंदीर कर्मचारी रांगेत उभे नसलेल्या इतर भाविकांचे दर्शन पास चिट्ठी देऊन व वशिलेबाजी करीत घेत असल्याचा आरोप केला.
तुळजाभवानी मंदिरात सशुल्क व्हीआयपी पास व अतिथी पास असे वेगवेगळे प्रकार असुन अतिथी पास म्हणजे मंदीर संस्थांनच्या विश्वस्त यांनी त्यांचे संबंधित व्यक्ती व व्हीआयपी यांना मोफत द्यायवाचे पास आहेत तर व्हीआयपी म्हणजे सशुल्क पास जे की 500 रुपये प्रतिव्यक्ती भरून थेट दर्शनासाठी दिले जातात. दोन्ही दर्शन पास काऊंटर हे एकच असल्याने आज मंदीर कार्यालयात गोंधळ उडाला व गर्दी झाली.
अतिथी पास याचा ठरलेला कोटा असला तरी कोण कोणत्या विश्वस्त यांनी कोणाची शिफारस केली, कोण दर्शन घेतले त्याची नोंद मंदीर संस्थानकडे उपलब्ध नाही अशी सूत्रांची माहिती आहे.अतिथी कोट्यावर काही जण कोट्याधीश झाले आहेत. चक्क राज्यबाहेरील व सधन गरजू भाविकांना या कोट्यातुन दर्शन घडवून दिले जात असल्याने एक प्रकारे दुरुपयोग वर्षानुवर्षे सुरु आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानने घेतलेल्या विश्वस्त मंडळाच्या ठरावानुसार अतिथी कोटा देण्यात आला आहे जो की मोफत दर्शनासाठी आहे. मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना पुर्वी हा कोटा नव्हता मात्र 13 जुलै 23 च्या ठरावानंतर त्यांना प्रथमच 10 जणांचा कोटा दिला आहे. तुळजापूर येथील स्थानिक आमदार तथा विश्वस्त व मंदिराचे सहायक जनसंपर्क अधिकारी या दोघांना सर्वाधिक प्रत्येकी 50 दर्शनाचा कोटा आहे.
मंदीर संस्थानचे विश्वस्त असलेले उपविभागीय अधिकारी, तुळजापूर तहसीलदार, नगराध्यक्ष, मंदीर तहसीलदार, पोलिस विभाग, कोर्ट विभाग या सर्वांना प्रत्येकी 10 पास आहेत. मंदीर प्रशासन अतिथी राखीव गेस्ट असा प्रोटोकॉल म्हणून 25 पास दिले आहेत अश्या प्रकारे जुना 125 व नवीन 70 असा एकूण 195 पासचा कोटा देण्यात आला आहे. अतिथी कोटा हा विषय नाजुक असल्याने त्याला कोणी धक्का लावत नाही शिवाय कोणाला याचा लाभ द्यावा बाबत फारशी सुस्पष्टता नाही.
व्हीआयपी दर्शनाबाबत विश्वस्त यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, गोंधळ उडू नये व भाविकांची व्यवस्था आमचे प्राधान्य असल्याचे मंदिराचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.